अनेक लोकांना दातांच्या वेगवेगळ्या समस्या होत असतात. अशात बरेच लोक किड लागलेले दात काढतात आणि दुसरे दात बसवून घेतात. पण दात काढणं किंवा बसवणं यामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो, याचा कुणी विचार केला नसेल. चीनमधून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका डेंटिस्टने एका व्यक्तीचे एका दिवसात 23 दात काढले आणि नंतर 12 बसवले. यानंतर व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. याचा खुलासा मृत व्यक्तीच्या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
मुलीचा हॉस्पिटलवर आरोप
द साऊथ मॉर्निंग चायना पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मृत व्यक्तीच्या मुलीने या हॉस्पिटलची सोशल मीडियावर पोलखोल केली. या मुलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझे वडील 14 ऑगस्टला योगकांग डेवे डेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दातांवर उपचार करण्यासाठी गेले होते. इथे पाच वर्षाचा अनुभव असलेल्या डॉक्टराने त्यांच्या सहमतीशिवाय त्यांच्यावर उपचार केले.
उपचारानंतर व्यक्तीला असह्य वेदना होत होत्या. तेच गेल्या 28 ऑगस्टला या व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मुलीने लिहिलं की, 'मी कधीच विचार केला नव्हता की, माझे वडील मला इतक्या लवकर सोडून जातील. आम्ही त्यांच्यासाठी नवीन कार खरेदी केली होती. ती सुद्धा चालवण्याची त्यांना संधी मिळाली नाही'.
योंगकांग मुन्सिपल हेल्थ ब्यूरोने या गंभीर केसबाबत एक माहिती जारी केली आहे. त्यात सांगण्यात आलं आहे की,हॉस्पिटलमध्ये याबाबत चौकशी सुरू आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दात काढणे आणि व्यक्तीच्या मृत्यूमध्ये 13 दिवसांचं अंतर होतं.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने हॉस्पिटल क्लीनिकच्या एका स्टाफने सांगितलं की, 'आम्ही याबाबत सध्याच काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. हे प्रकरण आम्ही वकिलांकडे सोपवलं आहे. काही अपडेट आली तर आम्ही बोलू. सध्या चौकशी सुरू आहे'.