पैसे लुबाडण्याच्या अनेक अजब अजब घटना नेहमीच समोर येत असतात. आता तर लोक पैसे लुटण्यासाठी देवाचं मंदिरही सोडत नाहीयेत. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका लॉ च्या विद्यार्थ्याने बौद्ध विहारांमधून पैसे चोरी करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली. जेव्हा प्रकरण समोर आलं तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीने मंदिरात लावण्यात आलेला QR कोड बदलून त्याजागी आपलं स्वत:चा QR कोड लावला. जेव्हाही भाविक दान करण्यासाठी हा QR कोड स्कॅन करत होते तेव्हा पैसे या व्यक्तीच्या खात्यात जमा होत होते. हा तरूण उच्चशिक्षित आणि कायद्याचा विद्यार्थी असूनही त्याने ही चोरी केली.
एका रिपोर्टनुसार, या कारनाम्याचं व्हिडीओ फुटेज सार्वजनिक करण्यात आलं आहे. व्हिडिओत दाखवण्यात आलं की, जेव्हा तरूण मंदिरातील मूर्तीसमोर वाकतो तेव्हाच तो तेथील QR कोड बदलून आपला QR कोड ठेवतो. त्यानंतर जेव्हाही भाविकांनी दान करण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन केला तेव्हा पैसे तरूणाच्या अकाऊंटमध्ये गेले.
या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. पोलिसांसमोर त्याने कबूल केलं आहे की, त्याने सिचुआन आणि चोंगकिंग प्रांतातील बौद्ध मंदिरांमध्ये अशाप्रकारे चोरी केली. या चोरीतून त्याने ४,२०० अमेरिकेन डॉलर म्हणजे ३.५ लाख रूपये लंपास केले.
या केसची चौकशी करणाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीने आतापर्यंत चोरी केलेली सगळी रक्कम परत केली आहे. पण सध्या ही घटना चीनमध्ये एक गंभीर विषय बनली आहे. ही घटना समोर आल्यावर लोक या गोष्टीने हैराण आहेत की, लोक चोरी करण्यासाठी देवाचं घरही सोडत नाहीयेत.