अंधविश्वास केवळ आपल्या देशात आहे असं नाही. जगभरातील लोकं आपलं नशीब चमकवण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी नको नको ते करतात. असाच काहीसा प्रकार एका विमान प्रवाशाने केला. एका प्रवाशाने त्याचा विमान प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी विमानासमोर नाणं वर फेकलं. पण हे नाणं विमानाच्या इंजिनात गेलं. त्यामुळे या विमान कंपनीला उड्डाण रद्द करावं लागलं. या घटनेमुळे फ्लाइट कंपनीला २१, ००० अमेरिकन डॉलर(१५ कोटी रूपये) चं नुकसान झालं आहे.
इंजिनात गेले १ युआनची दोन नाणी
घटना चीनच्या अन्हुई राज्यातील टियान्झुशान एअरपोर्टची आहे. रिपोर्टनुसार, उड्डाण घेण्याआधी विमानाची पाहणी केली जात होती. यादरम्यान एअरपोर्ट स्टाफला आढळलं की, विमानाच्या डाव्या इंजिनाजवळ १ युआन(चीनी करन्सी) ची दोन नाणी आढळली. त्यानंतर त्यांना विमानातील प्रवाशांना याची विचारपूस केली.
यासाठी फेकले होती नाणी
१६२ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या 'लकी फ्लाइट 8L9960' मधील लू नावाच्या एका प्रवाशाने नाणी फेकल्याचं मान्य केलं. या २८ वर्षीय व्यक्तीने सांगितले की, त्याने 'गुडलक' साठी नाणी फेकली होती. त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं. तर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आलं.
व्यक्तीला अटक
एअरलाइन्सने माहिती दिली की, नाण्यांमुळे फ्लाइट कॅन्सल करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होण्यासोबतच आम्हाला १४०, ००० युआन(२० लाख रूपये) चं नुकसान झालं. इंजिनमध्ये नाणी फेकणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणून अटक केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
मोठा अपघात टळला
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एखाद्या व्यक्तीकडून फेकण्यात आलेली नाणी टर्बाइनच्या माध्यमातून इंजिनपर्यंत पोहोचू शकतात. याने इंजिन फेल होऊ शकलं असतं आणि विमानाचा अपघात होऊ शकला असता. विमानाची दुरूस्ती करणाऱ्या इंजिनिअरने सांगितले की, ही गंभीर घटना होती.