कोणत्याही कंपनीत टार्गेट पूर्ण करू न शकल्यानंतर बॉस कर्मचाऱ्यांना शिक्षा करतात. तर काही बॉस दयाळू देखील असतात, जे कर्मचाऱ्यांना ध्येय कसं साध्य करावं याबद्दल सल्ला देतात. दुसरीकडे, कर्मचार्याने तरीही काम केलं नाही तर त्याच्या पगारातील वाढ कमी करून त्याला शिक्षा केली जाते. पण टार्गेट पूर्ण करू न शकलेल्या कर्मचाऱ्यांसोबत चीनमधील एका कंपनीने जे काही केलं ते धक्कादायक आणि अजब आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण चीनच्या जिआंग्शू प्रांताशी संबंधित आहे. जिथे शिक्षण आणि प्रशिक्षण कंपनी 'सुझोऊ दानाओ फांगचेंग्शी इन्फॉर्मेशन कन्सल्टिंग' ने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून कच्चं कारलं खाण्यास भाग पाडलं आहे. त्याचा व्हिडीओ चिनी सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कर्मचारी इच्छा नसतानाही कारलं खाताना दिसत आहेत.
या घटनेची जोरदार चर्चा रंगल्यानंतर कंपनीच्या स्पोक्सपर्सनला मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीने रिवॉर्ड अँड पनिशमेंट योजनेअंतर्गत हे केलं आहे. कर्मचार्यांनीच शिक्षा म्हणून कारलं खाणं पसंत केलं आहे. प्रवक्त्याने सांगितले की, "सामान्यत: लोक वेदना टाळतात आणि आराम शोधतात. कर्मचाऱ्यांना कारलं खायचं नसेल, तर पुढच्या वेळी अधिक मेहनत करतील.''
सोशल मीडियावर ही बातमी येताच सगळेच चक्रावून गेले. अशा प्रकारे अपमानित करणे योग्य नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. अनेकांनी कंपनीने दिलेल्या विचित्र शिक्षेचाही उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झेजियांग प्रांतातून अशीच घटना समोर आली होती. जेव्हा एका कंपनीने कर्मचार्यांना सेल्स टार्गेट गाठता न आल्याने कारलं खाण्यास भाग पाडलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.