चीनच्या एका डॉक्टरांनी 'इरोटोमेनिया' नावाच्या एका अनोख्या आजाराचा खुलासा केला आहे. डॉक्टरांनुसार, हा एक अजब डिसऑर्डर आहे. ज्यात रूग्णाला भ्रम होतो की, दुसरी व्यक्ती त्याच्यावर प्रेम करते. पण मुळात असं काही नसतं. डॉक्टरांनी एका विद्यार्थ्याच्या उपचारादरम्यान या आजाराबाबत खुलासा केला. ज्याला ‘भ्रमित प्रेम विकार’ म्हणजे ‘डिल्यूजन लव्ह डिसऑर्डर’ नावानेही ओळखलं जातं.
यूनिवर्सिटीमध्ये तरूणींना केलं प्रपोज
चीनमध्ये एक 20 वर्षीय विद्यार्थी या आजाराने ग्रस्त झाल्यानंतर सोशल मीडियावर या वेगळ्या डिसऑर्डरची चर्चा रंगली. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ च्या एका वृत्तानुसार, तरूणाला असं वाटत होतं की, त्याच्या यूनिवर्सिटीतील सगळ्या मुली त्याला पसंत करतात. यानंतर कॅम्पसमधील सगळ्या मुलींकडे त्याने त्याचं प्रेम व्यक्त करणं सुरू केलं. त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलींनी त्याला असं न करण्याचा इशारा दिला. तर त्याला वाटलं की, त्या मुली लाजाळू आहेत आणि त्याच्यासमोर प्रेम व्यक्त करण्यात घाबरत आहेत.
पण तरूणाविरोधात सतत तक्रारी आल्यावर त्याला डॉक्टरांकडे जावं लागलं. त्याने स्थानिक डॉक्टर लू झेंजियाओ यांना सांगितलं की, स्कूलमधील सगळ्या मुली मला पसंत करतात. डॉक्टरांनी त्याला विचारलं की, असं त्याला कधीपासून वाटतं. तर तो म्हणाला की, फेब्रुवारी महिन्यात ही लक्षणं दिसू लागली आणि आता स्थिती इतकी खराब आहे की, त्याला असं वाटतं सगळ्या मुली त्याच्या प्रेमात वेड्या आहेत. त्याशिवाय त्याने इतरही काही बदलांबाबत सांगितलं. ज्यात रात्रभर जागणं, क्लासमध्ये लक्ष न लागणं आणि बेजबाबदारपणे पैसे खर्च करणं असा समावेश आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, अशा केसेस सामान्यपणे मार्च आणि एप्रिल दरम्यान बघायला मिळतात. जेव्हा वातावरणात बदल होतो. ज्यामुळे मनुष्याचं शरीर आणि मेंदुमध्ये चढ-उतार जाणवतो. डॉक्टर म्हणाले की, अशा अनेक केसेसमधील रूग्ण संतापतात आणि हल्लाही करू शकतात. सध्या या तरूणावर उपचार सुरू आहेत आणि त्यात सुधारही होत आहे.