पैशांची गरज सगळ्यांनाच असते. पण काही लोक पैसे मिळवण्यासाठी अशा काही चुका करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. असंच काहीसं चीनमधील एका व्यक्तीसोबत झालं. त्याला पैशांची गरज होती म्हणून तो पेट्रॉल पंपावर चोरी करण्यासाठी गेला. त्याने चोरी केली नंतर त्याला त्याची चूक समजली आणि मग त्याला पोलिसांची भीती सतावू लागली.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 2009 मध्ये चीनच्या हुबेई प्रांतातील एन्शी शहराजवळील एका गावात राहणारा लियु मोफू (Liu Moufu) 30 वर्षांचा असताना त्याने काही साथीदारांसोबत पेट्रॉल पंपावर चोरी करण्याचा प्लान केला. पण त्यांचं नशीब खराब होतं त्यांच्या हाती केवळ 156 युआन म्हणजे साधारण 1800 रुपयेच लागले.
1800 रूपयांमधील 716 रूपये त्यांनी खाण्या-पिण्यात उडवले. तिघांनी शिल्लक राहिलेले पैसे आपसात वाटून घेतले. तिघेही एकमेकांपासून वेगळे झाले. पण काही दिवसांनी पोलिसांनी लियुच्या साथीदाराला अटक केली. लियुला माहीत होतं की, आता त्यालाही कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
तुरूंगात आयुष्य घालवण्यापेक्षा त्याने स्वत:ला कैद करण्याचा निर्णय घेतला. पण हे जरा वेगळं आहे. लियुने पोलिसांपासून वाचण्यासाठी एका गुहेचा आधार घेतला. बघता बघता दिवस उलटून गेले आणि तो 1 किंवा 2 नाही तर तब्बल 14 वर्ष या गुहेत राहिला.
तो अधून मधून गुहेतून बाहेर येत होता. 10-15 मिनिटात आपल्या गावाला जाऊन बटाटे, टोमॅटो अशा भाज्या चोरी करत होता आणि आपल्या परिवारालाही भेटत होता. पण त्याला कुणी पाहिलं आणि पोलिसांना सूचना दिली तर पुन्हा त्याला पळून जावं लागत होतं.
14 वर्ष तो जंगलातील एका गुहेत राहत होता. तो पुर्णपणे एकटा होता. त्याच्यासोबत काही कुत्रे होते. ज्यांच्या द्वारे तो जंगलातील प्राण्यांपासून स्वत:चं रक्षण करत होता. अखेर आपल्या या जगण्याला कंटाळून त्याने या वर्षाच्या सुरूवातीला स्वत:ला पोलिसांच्या हवाले केलं. त्याने स्वत:च्या तुरूंगात 14 वर्ष काढली. आता त्याला चोरीसाठी 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.