चीनमधील एका श्रीमंत शेतकऱ्याने जोश जोशमध्ये २ कोटी रूपयांची BMW कार खरेदी केली. काही दिवस त्याने मस्त हवा केली. पण नंतर कारमध्ये पेट्रोल भरून भरून त्याच्या नाकी नऊ आलेत. आता कार तर घेतली आहे आणि त्यात फिरायचं देखील आहे. तर या पठ्ठ्याने लोकांच्या घरातील कोंबड्या आणि बदक चोरीचा धडाका लावला. या कोंबड्या आणि बदक विकून तो त्याच्या बीएमडब्ल्यूची पेट्रोलची तहान भागवत होता. पण काय शेवटी चोरी ती चोरीच नाही. पोलिसांनी त्याला आता बेड्या ठोकल्या आहेत.
रिपोर्ट्सनुसार, एप्रिल महिन्यापासून सिचुआन प्रांतातील Linshui County गावातील पक्ष्यांची चोरी करत होता. त्याला पोलिसांनी पकडल्यावर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की, त्याने ही चोरी त्याच्या बीएनडब्ल्यूमध्ये पेट्रोल भरण्यासाठी केली होती.
(Image Credit : www.worldofbuzz.com)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती रात्री उशीरा त्याच्या बाइकने कोंबड्यांची चोरी करायला जात होता. पकडला गेल्यावर कोंबड्या आणि बदक त्याचे असल्याचे सांगत होता. पण जेव्हा पोलिसांनी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तेव्हा मात्र त्याची चोरी लपू शकली नाही.
२२ मे ला पोलिसांनी त्याच्या कारचा पाठलाग केला. पण तो पोलिसांना मागे टाकत पळून गेला. यावर पोलिसांनी सांगितले की, 'तो बीएमडब्ल्यूमध्ये होता आणि वेगाने जात होता. त्यामुळे आम्ही त्याला पकडू शकलो नाही'. पण नंतर त्याला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली.