(Image Credit : theconversation.com) (प्रातिनिधिक फोटो)
सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक काय काय नाही करत. खोटी कागदपत्रे, खोटी माणसं उभी केली जातात. पण चीनच्या एका परिवाराने सरकारी योजना मिळवण्यासाठी जे केलंय ते कधी बघायला अन् ऐकायलाही मिळालं नसेल. येथील एकाच परिवारातील लोकांनी दोन आठवड्यात २३ वेळा लग्नही आणि तेवढ्याच वेळा घटस्फोटही घेतला.
११ लोक, २ आठवडे, २३ लग्न आणि घटस्फोट...
सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, चीनमधील एकाच परिवारातील ११ लोकांनी २ आठवड्यात २३ वेळा लग्न केलं आणि घटस्फोटही घेतला. हे सगळं त्यांनी सरकारी योजनेत मिळणाऱ्या घरासाठी केलं. पॅन नावाच्या एका व्यक्तीला झेजियांग प्रांतातील लिशुई शहरातील एका गावात सरकारी योजनेबाबत माहिती मिळाली. या योजनेनुसार स्थानिक लोकांना ४३० स्क्वेअर फूटाचं एक घर मिळणार होतं. मग त्या लोकांकडे संपत्ती असो वा नसो.
लग्न, रजिस्ट्रेशन आणि मग घटस्फोट
पॅन नावाच्या व्यक्तीने सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वातआधी त्याच्या घटस्फोटीत पत्नीसोबत लग्न केलं. ती त्याच गावात राहणारी होती. नंतर त्याने रजिस्ट्रेशन केलं, घरासाठी अर्ज केला आणि मंजूरी मिळताच ६ दिवसांनी पत्नीला पुन्हा घटस्फोट दिला. पॅननंतर त्याच्या परिवारातील इतर लोकही या घोटाळ्यात सहभागी झाले.
एकमेकात लग्नाचा सिलसिला....
या योजनेचा लाभ घेण्याची लालसा इतकी वाढली की, पॅनने त्याची बहीण, मेहुणीसोबतही लग्न केलं आणि घटस्फोट घेतला. इतकेच नाही तर पॅनच्या वडिलांनी देखील काही नातेवाईक महिलांसोबत लग्न केलं. यात त्याची आई देखील होती. या सर्वांनीच एकमेकांसोबत लग्न केल्यानंतर गावातील नागरिक म्हणून घरासाठी रजिस्ट्रेशन केलं आणि नंतर घटस्फोट घेतले.
कसा झाला भांडाफोड?
पॅनने एका आठवड्यात तीन वेळा लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं. सरकारी अधिकाऱ्यांना पॅनवर संशय आला. चौकशी झाल्यावर समोर आलं की, लग्न करणाऱ्या ११ लोकांच्या घराचा पत्ता एकच आहे. सर्व लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.