(Image credit : Global Times)
पेइचिंग - सध्या अनेक देशांमध्ये अनेक कामांसाठी रोबोटचा वापर करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी धातूचे तुकडे आणि अनेक तारांपासून बनलेल्या अत्याधुनिक यंत्रमानव सोफियाची संपूर्ण जगभरात चर्चा होती. एवढचं नाही तर सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केलं असून एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश बनला आहे. त्यानंतर यंत्रमानव आणि मानव यांच्यामध्ये अनेक तुलनात्मक संशोधनं करण्यात आली होती. अशातच चीनमध्ये एका रेजिडेंशल कम्युनिटीने रोबोटला चक्क चौकीदारी करण्याची जबाबदारी दिली आहे.
पेइचिंगमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी कोणतीही व्यक्ती नाही तर चक्क एका रोबोटचा वापर करण्यात येणार आहे. हा रोबोट फेशिअय रेकॉग्निशन, मॅन-मशीन कम्युनिकेशनमार्फत सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचं काम करणार आहे. या रोबोटचे नाव 'मेइबाओ' असं ठेवण्यात आलं आहे. हा रोबोट अवैध्य कामांची माहिती पेइचिंगच्या मेइयुआन कम्युनिटीपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे.
पेइचिंग एयरोस्पेस ऑटोमॅटिक कंट्रोल इंस्टिट्यूटचे प्रोजेक्ट डायरेक्टर लिउ गांगजुन यांनी याबाबत सांगितले की, 'हा रोबोट डिसेंबर 2018 पासून एप्रिल 2019 पर्यंत तपासणीसाठी तैनात करण्यात आला आहे. पेइचिंग एयरोस्पेसकडून तयार करण्यात आलेला हा रोबोट तयार करण्यासाठी चायना अॅकॅडमी ऑफ लॉन्च वीकल टेक्नॉलॉजीने मदत केली आहे. देशातील सर्व आवासी क्षेत्रांमध्ये कोणत्याही माणसाऐवजी आता रोबोट पेट्रोलिंग करणार आहे.
हे तंत्रज्ञान बायोलॉजिकल रेकॉग्निशन, बिग डेटा एनालिसिस, नेविगेशन सिस्टम आणि इतर तंत्रज्ञानांसह काम करणार आहे. याव्यतिरिक्त इतर सुविधांचाही वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे पायी चालणाऱ्या व्यक्तींबाबत सहज माहिती जाणून घेणं शक्य होईल.
दरम्यान, भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील. रोबोट सर्वकाही करण्यास सक्षम असतील. माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल, असं वक्तव्य जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी सांगितले होते.