लग्नाआधीच नवरीने फसवल्याच्या किंवा नवरदेवाने पळ काढल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक अजब घटना सध्या चीनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. चीनमधील तरूण वांग प्रेयसीसोबत लग्न करण्याचे स्वप्न रंगवत होता. लग्न ठरलं सुद्धा, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे झालं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
वांग आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणार होता. सगळं काही ठरलं होतं. पण त्याची प्रेयसी ली ने वांगसमोर लग्नाआधीच्या एका जुन्या आणि अजब प्रथेचा उल्लेख केला. ली ने दावा केला की, लग्नाआधी सुहागरातचा बेड जाळण्याची प्रथा गरजेची आहे. ली ने सांगितलं की, या प्रथेनंतर ती तिच्या आधीच्या पतीच्या आत्म्यापासून वेगळी होईल. तसेच तिच्या नव्या नात्याला आधीच्या पतीच्या आत्म्याचा आशीर्वादही मिळेल.
वांग याला ही प्रथा माहीत नव्हती. पण त्याने ली च्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तसेच ही प्रथा पार पाडण्यासाठी त्याने पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. या प्रथेबाबत ली ने सांगितलं की, या प्रथेने ती आधीच्या पतीपासून पूर्णपणे मुक्त होईल. ली चा दावा होता की, लग्नाआधी ही प्रथा पार पाडली नाही तर तिच्या आणि वांगच्या नात्यात अडथळा येईल.
ली ने ही प्रथा पार पाडण्यासाठी वांगकडे १ लाख युआन म्हणजे साधारण ११ लाख रूपयांची मागणी केली. वांग प्रेमात आंधळा झाला होता आणि गंभीरता लक्षात घेत लगेच तिला पैसेही दिले. ली असंही म्हणाली की, जर वांग या प्रथेत सहभागी झाला तर हा अपशकुन होईल. त्याऐवजी ली ने त्याला काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले. ज्यात ही प्रथा दाखवण्यात आली होती. ते बघून वांग याला विश्वास बसला.
त्यानंतर ली ने वांग याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केलं. त्याच्यासोबत बोलणं बंद केलं आणि त्याच्या जीवनातून पूर्णपणे गायब झाली. शेवटी वांगच्या लक्षात आलं की, त्याची फसवणूक झाली आहे. आपले पैसे परत मिळवण्यासाठी तो पोलिसांकडे गेला.
पोलिसांनी ली चा शोध घेतला. प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, ली ने केवळ वांग यालाच नाही तर अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली. असंही समोर आलं की, ती खासकरून अशा लोकांना शिकार बनवत होती जे सिरिअस नात्याच्या शोधात असतात.