Jugaad to rob chocolates: उत्तर प्रदेशात एक विचित्र अशी चोरीची घटना घडली. या धक्कादायक पद्धतीने घडलेल्या चोरीच्या बातमीवर भलेभले आश्चर्यचकित होतील यात वादच नाही. उत्तर प्रदेशातून चोरांनी चक्क चॉकलेटची चोरी केली. घरातील गोदामात ठेवलेले सुमारे १७ लाख रुपये किमतीचे कॅडबरी चॉकलेट चोरट्यांनी पळवून नेले आणि कोणालाही याचा पत्ता लागू दिला नाही. CCTVपासून वाचण्यासाठी या चोरट्यांनी एक भन्नाट जुगाडदेखील केला. त्यांची ही कल्पना साऱ्यांनाच आश्चर्यचकित करणारी ठरली.
अशा चोरीची गोष्ट तुम्ही क्वचितच ऐकली असेल. या चोरीत ना पैसे चोरले गेले, ना दागिन्यांची चोरी झाली. चोरांनी चक्क चॉकलेट्सवर ताव मारत तब्बल १७ लाखांची चॉकलेट्स चोरून नेली. कॅडबरी कंपनीच्या डीलरच्या घरासमोर लोडर लावून चोरट्यांनी चोरीची पूर्ण व्यवस्था केली. या लोडरमध्ये सर्व चॉकलेट भरून चोरटे पसार झाले. चोरटे इतके हुशार होते की सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी CCTV रेकॉर्डिंग होणारा DVR काढून नेला, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये.
कॅडबरी चॉकलेट्सचा डीलर एका घरात गोदाम तयार करून दुसऱ्या घरात राहत होता. शेजाऱ्यांनी फोन करून डीलरला या चोरीची माहिती दिली. त्यानंतर व्यापाऱ्याने तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस शेजाऱ्यांची चौकशी करत आहेत. एवढेच नाही तर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. लवकरच चोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.