साऊथ कॅरोलिना (अमेरिका) : जगातील वजनात सर्वात मोठे बाळ जन्माला आले आहे. पाणघोड्याच्या वासराएवढे त्याचे वजन आहे. या बाळाचे नाव कोलिन आॅस्टीन केईस्लर आहे. त्याचे वजन १४.४ पौंड (६.५३ किलो) असून तो पाच महिन्यांच्या बाळाएवढा दिसतो. कोलिनची आई सिंडी आणि वडील आॅर्थर (३८) यांना आपण वजनदार बाळाचे आई-बाबा होणार असल्याची बऱ्यापैकी कल्पना होती परंतु ते एवढ्या वजनाचे असेल, असे त्यांना वाटले नाही. गरोदर सिंडीचे पोट खूपच मोठे दिसत होते. प्रत्येकाला वाटत होते की जुळे होईल. आम्हाला मात्र हे बाळ मोठे असेल, असे वाटत होते पण कोलिन एवढा मोठा असेल याची कल्पना नव्हती. मला तर धक्काच बसला, असेही त्यांनी सांगितले. कोलिनला भाऊ आणि बहीण आहे. रुग्णालयात बाळांचे वजन करण्याच्या तराजूवरही कोलिन मावत नाही. कोलिनचा जन्म झाला त्यावेळी तेथील परिचारिका आणि डॉक्टर तर आश्चर्याने थक्कच झाले, असे आॅर्थर म्हणाले. कोलिनला उचलून घेतल्यास तो पाच सहा महिन्यांच्या बाळासारखा दिसतो परंतु त्याने अजून मान धरलेली नाही. बाजारात त्याच्या मापाचे कपडेही उपलब्ध नाहीत त्यामुळे ते वेगळे शिवून घ्यावे लागले, असे आॅर्थर यांनी सांगितले.
जन्मत:च पाच महिन्यांच्या बाळासारखा दिसतो कोलिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2017 12:40 AM