वाघ, सिंहांसाठीचं अभयारण्य आपल्याला माहीत असेल. हत्ती, गेंड्यांचं अभयारण्यही परिचित असेल. पण, गायींचं अभयारण्य? हो, असंही एक अभयारण्य आहे आणि तेही जर्मनीत. सरकारी नव्हे, खासगी! अनेक गायींचं पालनपोषण तिथं केलं जातं. त्या जोडीला घोडे, कुत्रे, कोंबड्या, बदकं असे इतर प्राणीही सोबतच एकत्र, गुण्यागोविंदानं राहतात. मुख्य म्हणजे इथे गायींना दूध देण्याचं बंधन नाही, म्हणजे त्यांचं दूध काढलं जात नाही, ते विकलं जात नाही. गायी भाकड असल्या तरी त्यांचा अतिशय प्रेमानं सांभाळ केला जातो. गाय असो किंवा इतर कोणताही प्राणी, कोणत्याही कारणानं त्याला विकलं जात नाही. उलट ज्या गायी लोकांना नको असतील, भाकड झाल्या असतील, त्या गायी लोक या ‘अभयारण्या’त आणून देतात. या गायी आणि इतर प्राण्यांना बांधून ठेवलं जात नाही, त्यांच्याकडून कोणतीही कामं करून घेतली जात नाहीत. त्यांचं काम एकच. खायचं, प्यायचं, आराम करायचा, ऐश करायची! आणि तेच इथले प्राणी करतात. एकमेकांबरोबर खेळतात, मौजमस्ती करतात. जर्मनीतील बटजाडिंगन पेनिसुला हे शहर. तिथे ‘हॉफ बुटेनलँड’ नावाचं एक डेअरी फार्म होतं. गेर्डेस हे या डेअरी फार्मचे मालक. परंपरेनुसार आपल्या वडिलांकडून या फार्मची मालकी त्यांच्याकडे आली. इथे अनेक गायींचं दूध काढून नंतर ते विकलं जायचं. हे फार्मही अतिशय प्रसिद्ध होतं. गेर्डेस या डेअरी फार्मचं कामकाज पाहायला लागल्याबरोबर त्यांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. जर्मनीच्या त्या परिसरात, १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदाच या फार्ममध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर सुरू केला. त्याआधी परिसरात हा प्रयोग कोणीच केला नव्हता. पण, तरीही गेर्डेस समाधानी नव्हते. गायींचं दूध काढण्यासाठी कितीही प्रयोग केले, तरी ‘अघोरीपणा’ आपण कमी करू शकत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. कितीही अद्ययावत डेअरी फार्म असलं तरी तिथे गायींची अवस्था कोंडवाड्यासारखीच असते, त्यांना मुक्तपणे फिरता, संचार करता येत नाही. त्यांच्या दूधपित्या बछड्यांना मातेपासून दूर केलं जातं, जे दूध या वासरांनी प्यायला पाहिजे, ते त्यांना न मिळता, माणूस ते ओरबाडून घेतो, गायी अनेकदा बछड्यांना जन्म देतात; पण प्रत्येक वेळी त्यांना आपण त्यांच्या आचळांपासून हिसकावून दूर करतो. गायींचे बछडेही त्यामुळे कमकुवत, उपाशी, अर्धपोटी राहतात. या साऱ्या गोष्टी गेर्डेस यांना असह्य वाटू लागल्या. आपण गायींवर फारच अत्याचार करतो आहोत, असं त्यांना वाटायला लागलं. गेली अनेक वर्षे ते या गोष्टी पाहात होते. बछड्यांचं आपल्या आईसाठी मूक आक्रंदन करणं त्यांना अतिशय रानटीपणाचं वाटलं. त्यामुळे त्यांनी हा धंदाच सोडायचा ठरवला. गायींसह आपलं डेअरी फार्मच विकून टाकायचं त्यांनी ठरवलं. तसा निर्णयही घेतला. पण, गायींना प्रत्यक्ष ट्रॉलीत चढवताना पाहिल्यावर त्यांचं मन आणखीच द्रवलं आणि त्यांनी सौदा रद्द करून गायींना मुक्त केलं. आपल्याच डेअरी फार्ममध्ये पण मुक्त वातावरणात त्यांना बागडू द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. गायींसाठी मुळातच हे वातावरण खूपच अनुकूल होतं. कारण त्यांच्याकडे शंभर एकर हिरव्यागार गवताचं कुरण होतं. पैसे मिळाले नाहीत, तरी चालेल; पण गायींना ‘स्वातंत्र्य’ मिळालं पाहिजे, असं त्यांना वाटलं. गायींबरोबरच इतर प्राण्यांनाही इथे मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे यासाठी या फार्मचं रूपांतर त्यांनी चक्क एका ‘अभयारण्यात’ करून टाकलं. गेर्डेस म्हणतात, ‘आपल्याला जर धरती वाचवायची असेल तर प्राण्यांचा वापर करणं, त्यांना ओरबाडणं, आपल्या स्वार्थासाठी त्यांना राबवून घेणं आपल्याला पूर्णपणे थांबवलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी माझ्या परीनं सुरुवात केली आहे. काही चांगले बदल आपल्याला घडवून आणावे लागतात. तसे बदल घडवून आणण्याची आर्थिक शक्ती आपल्याकडे निश्चितच आहे, परंतु आपल्याला ते हवे आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. चहा-कॉफीसाठी गायी, म्हशींचंच दूध कशासाठी हवं? त्यासाठी ओटच्या दुधाचा वापरही आपण करू शकतो.’मानसिक आरोग्य विभागात वीस वर्षे काम केलेल्या कॅरेन मक यादेखील गेर्डेस यांच्यासोबत गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. हे दोघे मिळून गायींचा सांभाळ करतात. गायींबद्दलचं त्यांचं निरपेक्ष प्रेम पाहून लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनीही त्यांना मदत करणं सुरू केलं आहे. त्यामुळे या अभयारण्यात गायी अतिशय आनंदात आहेत. त्यांच्या आचळांना लुचणाऱ्या बछड्यांना आता कोणीही त्यांच्यापासून दूर करीत नाही.
जर्मनीत शाकाहार वाढतोय!कॅसल युनिव्हर्सिटीच्या मते जर्मनीमध्ये मांसाहारी लोकांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. लोक शाकाहाराला जास्त पसंती देत आहेत. गेल्या वर्षी जर्मनीत मांसाहाराचं प्रमाण प्रति व्यक्ती दरवर्षाला फक्त १२६ पाऊंड होतं. १९८९ पासून या देशात शाकाहारी लोकांची संख्या सतत वाढतेच आहे.