न्यूयॉर्क - अमेरिकेतील एका कंपनीने अशी नोकरी आणली आहे जिथे नोकरी करताना झोपणं आवश्यक असेल. म्हणजेच ज्या लोकांना खूप गाढ झोप लागते, असे लोक या पदासाठी आदर्श उमेदवार ठरतील.
अमेरिकेतील मॅट्रेस कंपनी कॅस्परने ही भन्नाट नोकरी आणली आहे. या कंपनीने आपल्य़ा वेबसाईटवर Casper Sleepers जॉब प्रोफाईलसाठी काही पात्रतासुद्धा नमूद केल्या आहेत. त्याशिवाय कंपनीने ड्रेसकोडसुद्धा कूल ठेवला आहे. हे काम करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार ११ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
न्यूयॉर्कस्थित कॅस्पर कंपनीची स्थापना सन २०१४ मध्ये झाली होती. कंपनीने आपल्या वेबसाईटवर या नोकरीबाबत जी माहिती दिली आहे. त्यानुसार जे कुणी या नोकरीसाठी अर्ज करणार असतील त्यांच्यामध्ये झोप येण्याची असामान्य क्षमता असली पाहिजे. त्याशिवाय टिकटॉक व्हिडीओ बनवून कॅस्परच्या सोशल मीडिया चॅनेलवर ते पोस्ट करावे लागतील. व्हिडीओमध्ये उमेदवारांना मॅट्रेसवर झोपण्याचा अनुभव सांगावा लागेल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ज्या उमेदवारांची निवड होईल, ते कामादरम्यान पायजमा परिधान करू शकतात. त्याशिवाय कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा फ्रीमध्ये वापर करू शकतात. तसेच त्यांना कामाच्या तासांमध्ये काही सवलतही मिळेल. कंपनीने सांगितले की, जे कुणी उमेदवार या पदासाठी स्वत:ला पात्र समजतातत, त्यांनी आपल्या स्लीप स्किलचा टिकटॉक व्हिडीओ बनवून अर्जासह शेअर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ११ ऑगस्ट आहे. उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे. मात्र मुख्य पात्रता ही त्याला कुठल्याही परिस्थितीत झोपण्याची आहे. कंपनीने सांगितले की, या पदासाठी न्यूयॉर्कमधील लोकांनी अर्ज केल्यास ते अधिक चांगले होईल. मात्र इतर शहरांमधील लोकही अर्ज करू शकतात.