नवी दिल्ली - उधारी बुडवणाऱ्या लोकांच्या शेकडो गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. तुमच्याकडूनही कधी ना कधी चुकून पाच पन्नास रुपयांची उधारी बुडाली असेल. मात्र केवळ २८ रुपयांची उधारी देण्यासाठी तब्बल ६८ वर्षांनंतर एक व्यक्ती अमेरिकेतून भारतात आली, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. आपल्या मुलाकडे अमेरिकेत जाऊर राहणाऱ्या एका गृहस्थांची एका हलवायाकडे २८ रुपयांची उधारी राहिली होती. मात्र त्याचा त्यांना विसर पडला नाही. ६८ वर्षांनंतर ८५ व्या वर्षी ते अमेरिकेतून भारतात आले आणि २८ रुपयांच्या बदल्यात १० हजार रुपये दिले. ही घटना हरियाणामधील हिसार येथील आहे.
भारतील नौदलामधील कॉमोडोर बी. एस. उप्पल निवृत्तीनंतर त्यांच्या मुलाकडे अमेरिकेत राहायला गेले. दरम्यान, नुकतेच ते हिसारमधील मोतीबाजार येथील दिल्लीवाला हलवाई यांच्याकडे आले. त्यानंतर त्यांनी दुकानाचे मालक विनय बन्सल यांना सांगितले की, तुमचे आजोबा शंभूदयाल बन्सल यांना मी २८ रुपये देणे आहे. मात्र मला अचानक इथून बाहेर जावे लागले. त्यामुळे १९५४ पासून ते पैसे देता आले नाहीत. त्यानंतर मी नौदलात भरती झालो.
उप्पल यांनी सांगितले की, मी तुमच्या दुकानावर दह्याच्या लस्सीमध्ये पेढे घालून पित असे. त्याची २८ रुपयांची उधारी माझ्याकडे देणे होती. मात्र नौदलातील सेवेदरम्यान, मला हिसारमध्ये येता आले नाही. त्यानंतर मी निवृत्तीनंतर अमेरिकेत मुलाकडे गेलो. मात्र अमेरिकेत गेल्यावरही मला दोन गोष्टी आठवायच्या. त्या म्हणजे तुमच्या आजोबांना देणे असलेले २८ रुपये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जिथून दहावी पास झालो ते हरजीराम हिंदू हायस्कूल. आता तुमची उधारी देण्यासाठी आणि शाळा पाहण्यासाठी मी खासकरून येथे आलो आहे, असे ८५ वर्षांच्या बी.एस. उप्पल यांनी सांगितले.
त्यानंतर बी.एस. उप्पल यांनी विनय बन्सल यांच्या हातामध्ये दहा हजार रुपयांची रक्कम ठेवली. मात्र विनय बन्सल यांनी ही रक्कम घेण्यास नकार दिला. तेव्हा उप्पल यांनी, माझ्या डोक्यावर तुमच्या दुकानाचे ऋण आहे. त्यातून मला मुक्त करण्यासाठी ही रक्कम स्वीकार करा, अशी विनंती केली. मी अमेरिकेमधून विशेष करून हे काम करण्यासाठी आलो आहे. आज माझे वय ८५ वर्षे आहे, त्यामुळे कृपया ही रक्कम स्वीकार करा, अशी पुन्हा एकदा विनंती केली.
त्यानंतर विनय बन्सल यांनी खूप संकोच करत ही रक्कम स्वीकारली. तेव्हा उप्पल यांनीही समाधान व्यक्त केले. त्यानंतर ते आपल्या शाळेत गेले. मात्र बंद झालेली शाळा पाहून त्यांची निराशा झाली. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये ज्या पाणबुडीने पाकिस्तानचे जहाज बुडवले होते. त्या पाणबुडीचे उप्पल हे कमांडर होते. ते या युद्धातून आपली पाणबुडी आणि नौसैनिकांना सुखरूप घेऊन आले होते. त्यांना नौदल पुरस्काराना सन्मानित करण्यात आले होते.