बीजिंग - उशीरापर्यंत काम केल्यानंतर कामादरम्यान एक तास झाेप घेतल्यामुळे एका कर्मचाऱ्याला चीनमध्ये कामावरुन काढण्यात आले. याविराेधात न्यायायालयाने त्याच्या बाजुने निकाल दिला असून कंपनीला ३.५ लाख युआन म्हणजे, सुमारे ४१.६ लाख रुपये एवढी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
चीनच्या जिआंग्सु प्रांतात ताईक्सिंग या शहरात यावर्षीच्या सुरूवातीला ही घडना घडली हाेती. झॅंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कंपनीत २० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी सेवा दिली हाेती. कंपनीमध्ये सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये ते त्यांच्या डेक्सवर झाेपलेले दिसले हाेते. त्यापूर्वीच्या दिवशी त्यांनी कामाचे तास संपल्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत काम केले हाेते. त्यामुळे त्यांना थाेडा थकवा आला हाेता. मात्र, झाेपेवरुन कंपनीने त्यांना शिस्त व सेवाशर्तींचे उल्लंघन केल्याचा आराेप करुन तत्काळ कामावरुन काढले. हा आपल्यावर अन्याय झाला, असे वाटल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. झॅंग हे २००४मध्ये कंपनीत रुजू झाले हाेते. कंपनीने त्यांना विचारले की, तुम्ही कामावर असताना किती वेळ झाेपले? त्यावर त्यांनी १ तास असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना घरी पाठविले.
एका चुकीची एवढी माेठी शिक्षा चुकीची : न्यायालय
न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल देताना म्हटले की, २० वर्षांच्या सेवा काळात पहिल्यांदाच ते कामाच्या ठिकाणी झाेपलेले आढळले. यामुळे कंपनीला काेणतेही गंभीर नुकसान झाले नाही. सेवा काळात झॅंग यांना कंपनीने पदाेन्नती, पगारवाढही दिली आहे. केवळ एका चुकीमुळे नाेकरीवरुन काढणे चुकीचे आहे, असे न्या. जू की यांनी आदेशात म्हटले.