छोट्याशा डासामुळे अनेक आजार निर्माण होतात. अनेकदा ते जीवघेणे देखील ठरू शकतात. डास चावल्यास (Mosquitoes Bite) माणसाला हे कधी कधी चांगलंच महागात पडू शकतं. तरीही एका देशात अब्जावधीच्या संख्येत डास सोडण्याची योजना आखली जात आहे. यासाठी डास चक्क लॅबमध्ये तयार केले जात आहेत. यामागचं कारण ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. ब्रिटन बेस्ड कंपनी यासाठी काम करत आहे.
योजनेनुसार, मोठ्या संख्येने डास अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेटमध्ये सोडले जातील. हे डास अब्जावधींच्या संख्येत असतील. पण या डासांची एक खास बाबही असेल. हे खास लॅबमध्ये तयार करुन त्यांना पर्यावरणात सोडलं जाईल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे डास का सोडले जाणार आहेत? Oxitec नावाच्या ब्रिटिश कंपनीत जीव वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत एक खास नर डास तयार केला आहे.
डासावर एक खास प्रोटीनही आहे, जे केवळ नर डासांना जन्म देऊ शकेल. ज्यावेळी हे डास कॅलिफॉर्नियातील जंगलात सोडले जातील तेव्हा मादी डासांच्याऐवजी तिथे नर डासांची संख्या वाढेल आणि धोकादायक आजार पसरणार नाहीत. या संपूर्ण प्रोजेक्टमागे एकच लक्ष्य आहे. एडेस एजिप्टी डास कमी करणं हा उद्देश आहे. हे डास चावल्याने यापासून धोकादायक आजार पसरतात.
जीका, चिकनगुनिया आणि यलो फीवरसारखे आजार एडेस एजिप्टी डास चावल्याने होतात. जेनेटिकली मॉडिफाइड डास जंगलात पोहोचल्याने इतर डासांची ब्रीड कमी होईल. यामुळे धोकादायक डासांची संख्या कमी होईल. या प्रोजेक्टसाठी अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण एजेन्सीनेही ग्रीन सिग्नल दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.