मुंबई : २०१७ वर्षात सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेडिंग राहिल्या आणि गाजत राहील्या. त्यातील काही वादग्रस्त होत्या म्हणून ट्रोल झाल्या तर काही विनाकारण वाद निर्माण करून ट्रोल केल्या गेल्या. अगदी एखाद्या चित्रपटापासून ते एखाद्या कंपनीच्य़ा जाहिरातीवरून नेटिझन्सकडून कोणत्याही गोष्टीला ट्रोल केलं गेलं. सध्या वाद निर्माण करून तो वाढवण्यामध्येही सोशल मीडियाचा अधिक वापर केला जातो. थेट संबंधित व्यक्तीशी संपर्क साधता येत असल्याने एखादी गोष्ट नाही पटली की नेटिझन्स लगेच सोशल मीडियावर व्यक्त होतात. त्यामुळेच अनेक वाद उफाळून येतात. २०१७ या वर्षात सोशल मीडियावर वादग्रस्त ठरलेल्या घटना आज आपण पाहणार आहोत.
पद्मावती चित्रपट
हे प्रकरण गेले अनेक महिने गाजत राहीलंय. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट अद्यापही पदर्शित झालेला नाही. राणी पद्मावतीबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये याकरता काही संघटनांनी पद्मावती चित्रपटावर आक्षेप घेतला होता. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. चित्रपटातील कलाकार दिपीका पदुकोन, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता हा वाद सोशल मीडियावरही प्रचंड गाजला. अनेक सेलिब्रिटींपासून ते अनेक प्रसिद्ध माध्यम संस्थांनी या वादावर आक्षेप घेतला होता.
प्रियंका चोप्रा आणि पंतप्रधान यांची भेट
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे बर्लिनमध्ये भेटले होते. त्यावेळेस प्रियंकाने गुडघ्यापर्यंत वनपीस घातला होता. देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जाताना कसं जावं याचीही जाण प्रियंका चोप्राला नाही का? असा प्रश्न उठवत तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं गेलं. खरंतर तिनं काय घालावं आणि काय नाही हा तिचा खासगी प्रश्न होता पण तरीही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. पण प्रियंकाने त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्युत्तर दिलंय.
स्नॅपचॅट सीईओ वाद
स्नॅपचॅट या आघाडीच्या सोशल अॅपच्या सिईओने भारताविरोधात वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्यानं म्हटलं होतं की स्नॅपचॅट हा भारतासारख्या गरीब लोकांसाठी नसून केवळ श्रीमंत नेटिझन्ससाठीच आहे. या वक्तव्यानंतर अनेक भारतीयांमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती. स्नॅपचॅटच्या सीइओला चांगलंच ट्रोल करून स्नॅपचॅट अनइनस्टॉल केलं होतं. नेटिझन्सने त्यावेळेस या सिईओलाही चांगलंच झापलं होतं.
‘जोडी’ मॅगझिन
साऊथ आशियातील प्रसिद्ध मॅगझिनच्या पृष्ठभागावर एका नववधूचा फोटो छापला होता, त्या नववधूने घातलेल्या कपड्यांमधून ती आपल्या मांड्या आणि पाय दाखवत होती. यामुळे दक्षिण भारतीयांची संस्कृती भ्रष्ट होतेय असा दावा करत अनेकांनी या मॅगझिनविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवला होता.
सोफिया हयात
मागच्या बिग बॉसची कॉन्टेस्टंट सोफिया हयातने आपल्या पायांच्या तळव्यावर स्वस्तिक काढले होते. तळव्यांवर काढलेल्या स्वस्तिकचा फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड करताच तिला साऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. यामुळे प्रत्येकाच्या भावना दुखावणं साहजिकचं होतं. आपण आपल्या शरीरावर काहीही कोरू शकतो असं दाखवण्यासाठी तिनं तळव्यांवर स्वस्तिक कोरलं. मात्र तिची ही शक्कल तिला फार महागात पडली.
झोमॅटोची जाहिरात
आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं याकरता कंपन्या आकर्षक जाहिराती तयार करत असतात. आपला टार्गेट ऑडिअन्स पाहून त्यानुसार जाहिरातींचा आशय तयार केला जातो. झोमॅटो या हॉटेलविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळानेही अगदी तेच केलं. तरुणांच्या तोंडात जे शब्द सर्रास असतात त्याच शब्दांचा वापर करून, त्या शब्दांना थोडासा वेगळा अर्थ देऊन जाहिरात तयार केली. शहरातील प्रत्येक सिग्नलवर ही जाहिरात झळकत होती. त्यामुळे काहींनी या कंपनीवर चांगलाच आक्षेप घेतला. अपशब्दांचा वापर जाहिरातीत करणं केव्हाही चुकीचंच असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.
ऑस्ट्रेलियन जाहिरात
ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीच्या जाहिरातीत गणपती बाप्पाला गायीचं मटण खाताना दाखवण्यता आलं होतं. या जाहिरातीबाबतीत जेव्हा भारतीयांना कळलं तेव्हा बराच वाद उफाळून आला होता. ही जाहिरात बंद व्हावी यासाठीही निवेदने देण्यात आली होती.
आणखी वाचा - डवच्या वर्णभेदी जाहिरातीवर ट्रोलचा भडिमार, अखेर कंपनीने मागितली माफी
झायरा वासिम वाद
झायरा वासिमनं दंगल चित्रपटात उत्कृष्ठ काम केलं होतं. पण तिचं हे काम तिच्याच अंगलट आलेलं. तिच्या बिनधास्त कामामुळे काश्मिरी लोकांनी तिच्यावर शब्दांची बरीच चिखलफेक केली होती. त्यानंतर तिनं फेसबूकवर पोस्ट करून सगळ्यांचीच बोलती बंद केली.