कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांना हैराण करणाऱ्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. एका व्यक्तीचा कोरोनाची लागण झाल्यावर केवळ 2 आठवड्यात मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या व्यक्तीने आधी कॅन्सरला मात देऊन नवं जीवन मिळवलं होतं. पण ते जीवनही कोरोनाने त्याच्याकडून हिसकावून घेतलं. ही अशाप्रकारची एकुलती एक केस आहे, ज्यात कॅन्सर सर्वायव्हरचा कोरोनामुळे केवळ 2 आठवड्यात मृत्यू झाला.
सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यावर लोक हळहळ व्यक्त करत आहेत कारण या व्यक्तीचं वयही जास्त नव्हतं. हा तरूण अमेरिकेतील असून त्याचं कोरोनामुळे निधन झालं.
द सनच्या रिपोर्टनुसार 34 वर्षीय जेफ्री गॅजेरिअनला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी तो डिज्ने वर्ल्ड स्टुडिओ आणि युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये फिरायला गेला होता. त्यादरम्यान तो आजारी पडला आणि संक्रमण झाल्यावर केवळ 2 आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला.
(Image Credit : dailymail.co.uk)
त्याच्या परिवाराने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे की, 'आमचा लाडका, सर्वांचा लाडका जेफ्री सकाळी देवाघरी गेला. त्याने फार सहन आणि चांगला लढा दिला. आम्हाला त्याची दररोज आठवण येईल. आम्ही त्याचे धन्यवाद देतो की, आम्हाला त्याच्यासोबत चांगले आणि नेहमी लक्षात राहतील असे क्षण घालवता आले'.
कॅलिफोर्नियात राहणारी जेफ्रीची बहीण लॉरीनने सर्वातआधी गेल्या शुक्रवारी फेसबुकवर त्याला व्हायरसचं संक्रमण झाल्याची माहिती दिली होती. जेफ्रीने आधी 2 मार्चला लॉस एंजेलिसहून ऑरलॅंडो, फ्लोरिडासाठी फ्लाइट घेतली होती. त्यानंतर तो मित्रांसोबत डिन्जे वर्ल्ड आणि युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये फिरायला गेला होता.
त्याला 8 मार्चला खोकल्याची समस्या झाला होती. दुसऱ्या दिवशी खोकल्यासोबत रक्त येऊ लागलं. दुसऱ्याच दिवशी त्याने घरी येण्यासाठी प्रवास केला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. फेसबुकवर शेअर केलेल्या माहितीनुसार त्याला आधी न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. त्याला अॅंटी-बायोटिक औषध देण्यात आलं. त्याला आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलं.