कोरोना व्हायरसने जगातील कितीतरी देशांमध्ये अजूनही थैमान घातले आहे. शेकडो लोकांचा रोज जीव जातो आहे. इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान भारताच्या तुलनेत इतर देशांच्या लोकांमध्ये कोरोनाची भीती अधिक आहे. इतकी की मेक्सिकोमध्ये कोरोनाच्या भीतीने एका भावाने दुसऱ्या भावाची हत्या केली.
मेक्सिकोमध्ये कोरोना व्हायरसने घाबरलेल्या एका 19 वर्षीय तरूणाने त्याच्या लहान भावाची हत्या केली. कारण त्याला भीती होती की, लहान भावामुळे त्यालाही कोरोना व्हायरसची लागण होईल. मेक्सिकोमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 251 केसेस समोर आल्या आहेत. अनेक शहरं लॉकडाउन करण्यात आली आहेत.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एंथनी पेडिला नावाच्या या तरूणाने त्याच्या 13 वर्षीय चुलत भावाची कोरोनापासून बचावासाठी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एंथनी आणि त्याचा भाऊ पेत्रिशिओ एकमेकांचे चांगले मित्र होते. एंथनीने 7 महिन्यांपूर्वीच एक पिस्तुल रूममध्ये आणून लपवलं होतं. एंथनीने पोलिसांना सांगितले की, त्याला माहीत नव्हते की, पिस्तुल लोडेड आहे.
दरम्यान पोलिसांना चौकशीदरम्यान असं आढळून आलं की, एंथनी कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे फार घाबरलेला होता. एंथनी आणि त्याचा भाऊ एकाच रूममध्ये राहत होते. त्यामुळे त्याने त्याच्या भावालाच आधी मारले. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एंथनीच एकटा मृतदेहाजवळ होता. त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्नही करत होता.
एंथनीने पोलिसांना सांगितले की, त्याने बंदूकीचा वापर केवळ यासाठी केला की, कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा. एंथनीला याची अजिबात माहिती नव्हती की, हा व्हायरस कसा पसरतो किंवा याची लागण कशी होते. पोलिसांनी सांगितले की, कोरोना व्हायरसबाबत पसरलेल्या अफवांमुळे एंथनी घाबरलेला होता. त्याने त्याच्या भावाच्या छातीवर बंदुकीची गोळी झाडली. त्याला नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. एंथनीला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.