तिरुवनंतपुरम – केरळच्या अलप्पुझा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्येच कोरोना काळात एका कपलनं लग्न केलं आहे. यावेळी नवरीनं पीपीई किट्स घातलं होतं. कारण नवऱ्या मुलाला कोरोना झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे लग्न लावण्यात परवानगी देण्यात आली.
अलाप्पुझा येथे राहणारे सोम आणि अभिराम या दोघांनी कोविड वार्डात लग्न केले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केरळमध्ये कपलने कोरोना काळातही चक्क कोविड वार्डात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या दोघांचे लग्न यापूर्वीच ठरलं होतं. परंतु नवऱ्याला कोरोना झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर नवरीने पीपीई किट्स घालून कोविड वार्डातच युवकासोबत लग्न केले. यावेळी संपूर्ण वार्डात लग्नाचं वातावरण होतं.
परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली. या दोघांना अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये कोविड वार्डात उपचारासाठी दाखल केले होते. कोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला. वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.
केरळमध्ये शनिवारी कोविडचे ७३ आरोग्य कर्मचाऱ्यांसह २६ हजार ६८५ कोरोना संक्रमित आढळले. त्याचसोबत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ती १ लाख ९८ हजारापर्यंत पोहचली आहे. केरळ सरकारने सांगितले की, राज्यात आतापर्यंत १३ लाख ७७ हजार १८६ लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. मागील २४ तासांत २५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात ५ हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करत कोरोनाचं संक्रमण कमी करण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.