लॉकडाऊनमध्ये सैराट झालं जी; प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने पळून गेलं कपल आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:33 PM2020-04-09T15:33:49+5:302020-04-09T15:52:54+5:30
हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या लग्नाला घरातून विरोध आहे. म्हणून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लोकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण अशात काही लोकांचं प्रेमही फूलत आहे. घरच्यांचा विरोध असल्याने अशा स्थितीतही प्रेमी युगुल पळून गेलं होतं. दोघांवरही लॉकडाऊनचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केरळच्या कोझीकोड जिल्ह्याजवळील थामारास्सेरी येथील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी घडली. याच दिवशी 21वर्षांची तरूणी तिच्या 23 वर्षी प्रियकरासोबत पळून गेली. मुळात दोघांचा धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता.
तरूणीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दोघांना पकडून मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं. कोर्टात तरूणी म्हणाली की, ती तिच्या मर्जीने प्रियकरासोबत गेली होती. दोघेही वयस्क असल्याने दोघांनाही पोलिसांनी सोडलं.
मात्र, कोर्टाच्या आदेशानुसार कोरोनामुळे लावण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचं थैमान वाढतच असल्याने इतर राज्यांसोबत केरळमध्येही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शिफारस केली जात आहे. लॉकडाऊन वाढवण्यावरही सरकार विचार करत असल्याचे समजते.