लातूर - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचा सर्वाधिक फटका हा विवाह सोहळ्यांना बसला आहे. केवळ २५ माणसांच्या उपस्थितीत दोन तासांत विवाह उरकण्याचे बंधन घातल्याने वधु-वरांसह कुटुंबीयांचा हिरमोड होत आहे. मात्र या कोरोनाकाळात लातूरमध्ये असा एक विवाह सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी दोनशेहून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. मात्र तरीही या विवाह सोहळ्यावर कोरोनाचे नियम मोडल्याचा आक्षेप कुणी घेऊ शकणार नाही. तसेच वऱ्हाड्यांबाबतची माहिती कळल्यावर या वधूवरांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
याबाबतचे वृत्त एबीपी माझाने प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार लातूरमधील डॉ. सचिन आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. कोरोनाकाळात झालेला हा विवाहसोहळा एका वेगळ्याच कारणासाठी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण म्हणजे हा लग्नसोहळा कुठल्याही घरी, रिसॉर्टवर किंवा मंगलकार्यालयात नाही तर एका गोशाळेमध्ये संपन्न झाला. कोरोनाच्या नियमावलीमुळे विवाहाला मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. मात्र लग्नात वऱ्हाडी म्हणून वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी २०० हून अधिक गाई वऱ्हाडी म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. सचिन चांडक आणि भाग्यश्री झंवर यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच ठरला होता. मात्र कोरोनामुळे लग्नसोहळ्याच्या आयोजनात अनेक अडथळे येत होते. त्यामुळे हा विवाह श्री गुरू गणेश जैन गोशाळेत आयोजित करण्याची कल्पना कुटुंबीयांना सूचली. अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून गोमातांच्या आशीर्वादाने हा विवाह आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार हा विवाह सोहळा संपन्न झाला. तसेच या विवाहाला उपस्थित असलेल्या गोमातांसाठी पुरणपोळींचे भोजन ठेवण्यात आले. सर्व नियम पाळून अगदी थोड्या वेळात हा विवाह सोहळा पार पडला.