सध्या जगभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांचा आकडा भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोनाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता यावं. यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. अशा परिस्थीतीत सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय तो म्हणजे रोजगाराचा. भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला पगार पूर्ण दिला असला तरी काही टक्के जनता अशी आहे ज्याचं हातावर पोट आहे.
लॉकडाऊनचा फटका अनेक लहान मोठ्या व्यापारी आणि व्यावसाईकांना सुद्धा बसत आहे. अशा परिस्थितीत अनेकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. समाजातील अनेक सधन लोकांनी गोरगरीब जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशाच एका गृहस्थाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केरळ राज्यातील चकुन्नी या नावाच्या गृहस्थाने या गंभीर परिस्थितीत कमालीचे साहाय्य केले आहे. जेव्हा दुकानादारांना नुकसानाचा सामना करावा लागतोय ही गोष्ट लक्षात आली तेव्हा ते मदतीसाठी पुढे आले. चकुन्नी यांची कोझिकोडे येथं जागा आहे. त्यांची १०० पेक्षा जास्त दुकानं आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली पैशांची अडचड लक्षात घेऊन त्यांनी दुकानदारांना एका महिन्याचं भाडं देऊ नका असं सांगितलय.
''अनेक वर्षांपूर्वी मी सुद्धा यात परिस्थितीत होतो. म्हणून व्यवसायावर संकट आल्यानंतर किती त्रास सहन करावा लागतो.याची मला कल्पना आहे. म्हणून मी दुकानदार बांधवांना मदत करायचं ठरवलं आणि इतरांना मदत करण्यासाठी ही अचुक वेळ आहे,'' असं चकुन्नी म्हणाले. त्यानंतर त्यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला.
१९६८ मध्ये त्यांनी स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी सेल्समन म्हणून सुरूवात केली. व्यवसाय करताना किती अडचणींचा सामना करावा लागतो. याची कल्पना असल्याचे चकुन्नी म्हणाले. ''अनेक भाडेकरूंनी आम्ही नंतर भाडं दिलं तर चालेल का?'' अशी विचारणा केली. त्यानंतर चकुन्नी यांना दुकानदारांकडे पैसे नसल्याची जाणीव झाली, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.
जेव्हा चकुन्नी भाडेकरूंना भेटण्यासाठी गेले. तेव्हा दिवसभरात फक्त एकच ग्राहक आल्याचे त्यांना दुकानदारांशी बोलताना कळलं. अनेकांनी तर भाडं भरण्यासाठी कर्जसुद्धा घेतलं होतं. आपल्या कामगारांचा पगार देण्यासाठी सुद्धा दुकानदारांकडे पैसे नव्हते. असं चकुन्नींच्या निदर्शनास आलं.
त्यानंतर चकुन्नी यांनी आपले ऑडिटर आणि या जागांची मालकी असणाऱ्या कुटुंबातील इतरांशी संपर्क साधून १०० दुकानांचं १२ लाखांचं भाडं माफ करत असल्याचं जाहीर केलं.चकुन्नी म्हणाले ''मी गेल्या ५७ वर्षांपासून व्यवसायिक आहे. या काळात मी एक गोष्ट शिकलो आहे ती म्हणजे फायदा आणि नुकसानाचा विचार न करता माणुसकीचा विचार सुद्धा करायला हवा.'' असं चकुन्नी म्हणाले.