जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 31 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना काही लोकांचा हलगर्जीपणा पाहायला मिळत आहे. काही जण लस न घेण्यासाठी 'धोकादायक युक्त्या' शोधून काढत आहेत. ते स्वतः मुद्दाम कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत, जेणेकरून त्यांना लस घ्यावी लागू नये.
'डेली मेल' ने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीमध्ये अँटी वॅक्सर (Anti Vaxxer) लसीकरण टाळण्यासाठी विचित्र युक्त्या शोधत आहेत. इटलीमध्ये 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्येकासाठी (50 वर्षांपेक्षा जास्त) लस घेणे अनिवार्य होणार आहे. लस न घेणाऱ्यांवर सरकार कारवाई करून दंड आकारणार आहे. नोकरीही जाऊ शकते. मात्र असं असतानाही काही लोक समजून घ्यायला तयार नाहीत. इटालियन अँटी वॅक्सर्स (Anti Vaxxers) कोविड-पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर आणि वाईन पार्टी करत आहेत जेणेकरून ते स्वतःला संक्रमित करू शकतील. यासाठी ते स्वत: 10 हजार रुपयांहून अधिक खर्च करत आहेत.
10,000 रुपये मोजून कोरोना पॉझिटिव्ह लोकांसोबत केली जातेय डिनर पार्टी
लसविरोधी लोक कोविड पार्टीमध्ये (Covid Party) सामील होत आहेत. आपले पैसे खर्च करून, ते संक्रमित लोकांसोबत गुपचूप पार्टी करत आहेत जेणेकरून ते देखील कोरोना पॉझिटिव्ह होतील आणि त्यांना लस घ्यावी लागणार नाही. कारण संक्रमित लोकांना काही काळ लसीकरण केले जाणार नाही. टस्कनी येथे एका कोविड पार्टी संदर्भातली माहिती उघडकीस आली. जिथे लोक कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत डिनर आणि वाईनचा आनंद घेत होते. त्यात सामील होण्यासाठी £110 (11 हजार रुपये) शुल्क ठेवण्यात आले होते.
'द डेली बीस्ट'ने इटालियन पोलिसांचा हवाला देत म्हटले आहे की, एका अँटी वॅक्सरने ऑनलाइन लिहिले - "मी तातडीने कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या शोधात आहे. मी पैसे देण्यासही तयार आहे." त्याच प्रकारे लोक कोविड पार्ट्यांच्या शोधात फिरत असल्याचं सांगण्यात आले. दरम्यान, इटलीमधून कोविड पार्टी करत असल्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अशा घटना घ़डल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.