जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाविरूद्धचे युद्ध भारतात अजूनही सुरू आहे. या विषाणूचा वाढता प्रभाव बघता सरकारने संपूर्ण देशात 17 मे पर्यंत लॉकडाउन सुरू आहे. यादरम्यान देशात केवळ जीनावश्यक वस्तूंची विक्री होत आहे. विविध ठिकाणी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी भन्नाट शक्कल लढवत विक्रेते दूध, मासे, भाज्या, फळे आणि घरगुती वस्तूंची विक्री करत असल्याचे पाहायला मिळते आहे.
नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. यात दूध विक्रेत्याने अनोखी आयडियाची कल्पना शोधून काढली आहे. दूध विक्रेत्याने लढवलेली युक्ती पाहून अनेकजण थक्क होत आहे.
कुठेही सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होवू नये म्हणून त्याने बाइकवर दुधाच्या कॅन लटकवल्या आहेत. या दूधाच्या कॅनमध्ये एक मोठा पाईप लावला आहे. या पाईपद्वारे तो दूध विक्री करतो आहे. दूध विक्रेत्यामध्ये आणि ग्राहकामध्ये बरेच अंतर ठेवण्यास यातून मदत झाली आहे. हा फोटो वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
'लॉकडाऊनमध्ये, सोशल डिस्टंसिंगचे कशाप्रकारे पालन केले जात आहे याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल, हे नक्कीच कौतुकास्पद असून यांतून बोध घेण्यासारखे आहे असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
प्रवीण कासवान यांनी शेअर केलेल्या या फोटोवर लोक वेगवेगळ्या मजेशीर कमेंटदेखील करत आहेत. देशातील अशा वेगवेगळ्या ठिकाणी सोशल डिस्टंन्स पाळण्यासाठी भन्नाट युक्त्या लढवल्या जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.