कोरोना व्हयरसच्या वाढत्या थैमानामुळे जगभरातील देश हवालदिल झाले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी प्रत्येक देश वेगवेगळे उपाय करत आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसबाबत मलेशिया सरकारने एक अजब आदेश दिला आहे. मलेशियातमहिला आणि परिवार कल्याण मंत्रालयाने लॉकडाऊनमुळे घरातून काम करणाऱ्या महिलांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सरकारने एक पोस्टर जारी करून महिलांना घरातच नेहमीप्रमाणे मेकअप करण्याचा आणि नेहमीप्रमाणे कपडे घालण्याचा सल्ला दिलाय. पण सरकारच्या या सल्ल्यावर टीका होत आहे.
मलेशिया सरकारने लॉकडाऊनला ध्यानात ठेवून सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात लिहिले आहे की, इतकी लांब सुट्टी आणि घरातून काम करणं अडचणीचं ठरू शकतं. कारण बऱ्याचदा त्यांचं लक्ष भरकटतं. जर त्यांच्या पार्टनरकडून घरातील काम करताना काही चूक झाली तर त्यावर फार लक्ष देऊ नका. या पोस्टवर टीका झाल्यावर ही पोस्ट काढण्यात आली.
मंत्रालयाने एका पोस्टरच्या माध्यमातून सोफ्यावर आराम करत असलेल्या एका व्यक्तीच्या फोटोसोबत लिहिले होते की, जर तुम्ही तुमच्या पार्टनरला काही चुकीचं करताना बघितलं तर त्याकडे दुर्लक्ष करा. तक्रार न करता त्यांना तुम्ही गमतीने कार्टूनसारखा आवाज काढून काही बोलू शकता. तर दुसऱ्या काही पोस्टमध्ये महिलांना सांगण्यात आले आहे की, पतीची घरातील कामासाठी मदत मागताना फटकळपणे मागू नये. जर राग आलाच तर 1 ते 10 उलटी गणती करा. तसेच शांत रहा.
महिला संघटनांनी यावर म्हटलं आहे की, लॉकडाऊनमध्ये घरातून काम करताना शिस्त असणे, ऑफिसचं रूटीन फॉलो करणे आणि योग्य ड्रेसिंग करणे हे चालू शकतं. पण लूक आणि मेकअपवर जोर देणं गरजेचं नाही. सरकारने अशाप्रकारे महिला विरोधी वक्तव्ये करण्यापेक्षा कौटुंबिक हिंसाचार पीडितांवर लक्ष द्यावं. सध्या महिला सर्वात जास्त धोक्यात आहेत.