जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. तर अनेक देशांत कडक लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हॉटेल, क्लब बंद ठेवण्यात आले आहेत तर अनेक ठिकाणी पर्यटनावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. पण असं असताना एक अजब घटना समोर आली आहे.
कोरोनाचा संसर्ग व्हावा म्हणून एक तरुणी सध्या धडपड करत आहे. अनोळखी लोकांना मिठ्या मारत असल्याची घटना आता समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामधील एका तरुणीने स्वत:च्या लग्न सोहळ्याच्याआधी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेगळच धोरण स्वीकारलं. ही तरुणी स्वत: कोरोनाबाधित होण्यासाठी प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मॅडी स्मार्ट नावाच्या तरुणीने टिकटॉवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अनोळखी व्यक्तींना मिठ्या मारताना दिसतेय.
कोरोनाच्या संकटात 'ती' स्वत:ला 'असं' करतेय संक्रमित
एका नाईट क्लबमध्ये ही तरुणी कोरोनाचा संसर्ग व्हावा या उद्देशाने अनोळखी लोकांना मिठ्या मारत आहे. मेलबर्नमधील हा व्हिडीओ आहे. ऐन लग्नाच्या वेळी कोरोनाचा संसर्ग होऊन संपूर्ण कार्यक्रम रद्द करावा लागू नये म्हणून ही महिला आता स्वत:ला संसर्ग करुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. 'कॅच कोविड नॉट फिलिंग्स' अशा कॅप्शनचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यामध्ये ती आपले ड्रिंक्स इतरांसोबत शेअर करतानाही दिसते. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
"जेव्हा पुढील सहा आठवड्यांमध्ये तुमचं लग्न असतं आणि तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालेला नसतो" असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व डान्स क्लब आणि पब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याधीच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.