पाटणा: जगात सर्वत्र सध्या कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून जवळपास ३४ हजार लोकांना जीव गमवावा लागलाय. भारतातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारपेक्षा अधिक आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला. अनेकांनी कोरोनासाठी वटवाघळांना जबाबदार धरलं. मात्र भारतातल्या एका गावात वटवाघळांची पूजा केली जाते. अनेक जण कोरोनाच्या फैलावासाठी वटवाघळांना जबाबदार धरत आहेत. मात्र बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या राजापाकरमधल्या सरसाई गावात वटवाघळांची कित्येक वर्षांपासून पूजा होत आहे. वटवाघळं सरसाई गावची रक्षक असून त्यांच्यामुळे समृद्धी येते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे वटवाघळं गावात कोणतंही शुभ कार्य सुरू करण्याआधी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा अविभाज्य भाग असतात. वटवाघळांमध्ये भरभराट होते, संरक्षण होते, अशी ग्रामस्थांची भावना आहे.वटवाघळं संपूर्ण गावाचं रक्षण करतात, अनुचित प्रकार रोखतात, असं ग्रामस्थांना वाटतं. वटवाघळांमुळे आजार, साथीचे रोग गावापासून दूर राहतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. गावाजवळच्या तलावाच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडावर शेकडो वटवाघळं आहेत. 'एखादी अनोळखी व्यक्ती गावात येत असल्यास वटवाघळं जोरजोरात ओरडू लागतात. मात्र गावातली व्यक्ती येत असताना वटवाघळं अतिशय शांत असतात,' अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. खूप वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यात रोगाची साथ पसरली होती. तेव्हा वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केली. ही वटवाघळं सरसाई गावात आली, असं ग्रामस्थांनी सांगितलं. वटवाघळं स्थलांतरित झाल्यानंतर एकही साथीचा रोग गावात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
CoronaVirus: कोरोनाच काय, 'या' गावात पोहोचला नाही कुठलाच साथीचा आजार; कारण वाचून चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 1:28 PM