विज्ञान हे मनुष्यासाठी वरदान आहे. आज वैज्ञानिक अनेक संशोधन करुन अशी औषधे तयार करत आहेत ज्या माध्यमातून मनुष्यांना अनेक गंभीर आजारातून सुटका मिळते. पण विज्ञान हा कुणासाठी तरी अभिशापही आहे. एक असा अभिशाप जो काहींसाठी मृत्यू घेऊन येतो.
असेच काहीसे एका विशिष्ट्य जातीच्या खेकड्यासोबत होत आहे. उत्तर अमेरिकेतील सुंदर समुद्रात हॉर्सशू हे दुर्मिळ खेकडे आढळतात. या खेकड्यांचा आकार घोड्यांच्या नालसारखा असतो. त्यामुळे त्यांना हॉर्सशू क्रॅब म्हटले जाते. पण या खेकड्याचं वैज्ञानिक नाव Limulus Polyphemus असं आहे. या खेकड्यांना मनुष्यासाठी वरदान समजलं जातं. पण या खेकड्याचं हेच वेगळेपण त्याच्यासाठी अभिशाप ठरत आहे. त्यामुळेच या प्रजातीच्या खेकड्यांची संख्या कमी झाली आहे.
काय असतो रक्ताचा निळा रंग?
असे मानले जाते की, हॉर्सशू खेकडे पृथ्वीवर गेल्या ४५ हजार वर्षांपासून आहेत. आणि इतक्या वर्षात या खेकड्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. इतर प्राण्यांप्रमाणे यांचं रक्त लाल नाही तर निळं असतं. कारण यांच्या रक्तात मनुष्याच्या रक्ताप्रमाणे हिमोग्लोबिन आणि आयर्न नाही तर हिमोस्यायनिन तत्व असतं. जे निळा रंग निर्माण करतं. हिमोस्यायनिन सुद्धा शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं.
काय आहे महत्व?
या खेकड्यांच्या रक्ताची आणखी एक खासियत म्हणजे यांचं रक्त खराब बॅक्टेरियाची लगेच ओळख पटवतं. मनुष्यांच्या शरीरात ज्या औषधांचा वापर केला जातो, त्यात असलेल्या अनेक हानिकारक बॅक्टेरियांची ओळख पटवण्यात ते सक्षम असतं.
इतकी मिळते किंमत
या खेकड्यांच्या याच वेगळेपणामुळे या खेकड्यांचं रक्त १० लाख रुपये प्रति लिटर विकलं जातं. यांचं रक्त काढण्यासाठी प्रत्येकवर्षी साधारण ५ लाख खेकड्यांना मारलं जातं.
हालअपेष्टा करुन काढलं जातं रक्त
या खेकड्यांचं रक्त काढण्याची प्रकिया फार वाइट असते. या खेकड्यांना एका स्टॅंडवर फिट केलं जातं. नंतर त्यांच्या तोंडात सिरिंज टाकून पाईपच्या माध्यमातून त्यांचं रक्त काढलं जातं. हे करताना जास्त रक्त काढलं गेल्याने खेकड्यांचा मृत्यूही होतो. तर जे खेकडे जिवंत राहतात त्यांना पुन्हा पाण्यात सोडलं जातं.