अनेकांना घरामध्ये जुन्या वस्तू सजवण्याची खूप आवड असते. ते अनेकदा फिरायला जातात तेव्हा तेथून जुन्या आणि पुरातन वस्तू खरेदी करून घरी आणतात. पण अनेकदा असं घडतं की आपल्याला त्या पुरातन वस्तूंच्या दुकानांबद्दल माहितीही नसते किंवा ते किती जुने आहेत किंवा त्यांचं महत्त्व काय आहे हेही समजत नाही. असंच काहीसं एका ब्रिटीश जोडप्यासोबत घडलं. या जोडप्याने काही वर्षांपूर्वी त्यांच्या बागेत ठेवण्यासाठी एक पुतळा विकत घेतला होता (200 Year Old Statue at Couple’s Garden)
डेली स्टारच्या वृत्तानुसार, एका जोडप्याने सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांची बाग सजवण्यासाठी एक पांढऱ्या रंगाची मूर्ती विकत घेतली होती. ज्यामध्ये एक स्त्री दगडावर डोकं ठेवून झोपलेली दिसते. हे पाहून वाटतं की एकतर ती झोपली आहे किंवा उदास पडून आहे. रिपोर्टनुसार, या जोडप्याने ही मूर्ती 5 लाख रुपयांना विकत घेतली होती परंतु अलीकडेच या मूर्तीशी संबंधित एक धक्कादायक रहस्य उघड झालं आहे (Antique Statue of Woman in Couple's Garden).
अहवालानुसार, अनेक वर्षांपासून ही मूर्ती त्यांच्या बागेत ठेवलेली होती. अचानक त्यांना वाटलं की या मूर्तीची खरी किंमत सांगू शकेल अशा तज्ञांकडून याची तपासणी करून घ्यावी. यानंतर तज्ञांनी तपास केला आणि सांगितलं की हा एक सामान्य पुतळा नसून महान इटालियन निओ-क्लासिकल कलाकार अँटोनियो कानोव्हा यांचा उत्कृष्ट नमुना आहे, ही मूर्ती 1800 च्या काळात बनविली गेली होती. तज्ज्ञांनी या मूर्तीची सध्याची किंमत ५० कोटी ते ८० कोटींच्या घरात सांगितली असून, ती खरेदी केलेल्या किमतीपेक्षा खूपच जास्त आहे.
ही मूर्ती मेरी मॅग्डालीनची आहे, जी येशू ख्रिस्ताची अनुयायी होती. हा पुतळा प्रथम १८१९ मध्ये माजी ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड लिव्हरपूल यांनी घेतला होता. हा ६ फुटाचा पुतळा नंतर त्यांच्या कुटुंबियांनी विकला होता. तेव्हापासून तो एका भव्य घरात ठेवण्यात आला होता, जिथे नंतर आग लागली. २००२ मध्ये गार्डन स्टॅच्यू ऑक्शनमध्ये या मूर्तीचा अवघ्या 5 लाख रुपयांना लिलाव झाला होता. या कलाकृतीला स्लीपिंग ब्युटी असे नावही देण्यात आले आहे