लग्नानंतर अतिशय उत्साहात हनीमूनला गेलेल्या जोडप्याच्या आनंदावर विरजण पडलं. हनीमूनसाठी बार्बाडोसला गेलेल्या नवदाम्पत्यावर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहण्याची वेळ आली. त्यामुळे हनीमूनचा विचका झाला. हनीमून ट्रिपवर घडलेला संपूर्ण प्रकार नवविवाहितेनं सांगितला आहे. हनीमूनला गेले असताना वेगवेगळं राहावं लागल्यानं दोघेही निराश झाले.
मिरर युकेनं दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधल्या किसविकमध्ये वास्तव्यास असलेली २७ वर्षीय एमी आणि ३३ वर्षांचा एल्बर्टो यांचा विवाह नुकताच संपन्न झाला. लग्नानंतर ते बार्बाडोसला फिरायला गेले. मात्र कोरोनामुळे त्यांच्या आनंदावर पाणी फेरलं गेलं. लंडनहून उड्डाण करण्याआधी दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. ब्रिजटाऊन विमानतळावर लँड झाल्यानंतर पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. एलबर्टोचा अहवाल निगेटिव्ह आला. पण एमीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
यानंतर नवविवाहितेला हॉटेलऐवजी प्राथमिक शाळेत असलेल्या विलगीकरणात ठेवण्यात आलं. एमीला ६ अनोळखी व्यक्तींसोबत राहावं लागलं. त्या ठिकाणी पाणी आणि स्वच्छतागृहाची अवस्थादेखील फार चांगली नव्हती. 'स्वच्छतागृहात टॉयलेट पेपर नव्हता. बेडवर उशी नव्हती. झोपण्यासाठी केवळ एक पातळ चादर देण्यात आली होती. आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांमध्ये आम्हाला असा अनुभव येईल याची कल्पनादेखील कधी केली नव्हती,' असं एमीनं सांगितलं.