वाढत्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यात कोरोनानं तर लोकांचं जगणं कठीण झालं आहे. महागाईच्या काळात आता कौटुंबिक कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं तरी लोकांना हातचं राखून खर्च करावा लागत आहे. त्यात लग्न समारंभ म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टींसाठी बराच पैसा खर्च होतो. यात वऱ्हाडी मंडळीच्या जेवणावर सर्वाधिक खर्च होतो. त्यात जेवण चांगलं नसलं तर पाहुण्यांकडून ठेवली नावं ठेवली जातात ते तर वेगळं सांगायलाच नको. पण जेव्हा वर-वधूला नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी भेटवस्तू देण्याची वेळ येते तेव्हा झालेल्या खर्चाचा कुणी विचार करत नाही. यावर एका जोडप्यानं अनोखी शक्कल लढवली आहे. लग्नाचा खर्च वसुल करण्यासाठी वर-वधूनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतच येणाऱ्या पाहुण्यांसाठी 'रेट कार्ड' छापलं आहे. यात जो जसा आहेर देईल, त्याला त्याच पद्धतीचं जेवणं मिळेल, असा संदेश देण्यात आला आहे. (Couple offer guests food depending on expensive gifts in their wedding and sends them rate card)
लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी अनोखी डिझाइन्स, हटके संदेश ही अशी अनेक उदाहरणं तुम्ही आजवर पाहिली असतील. पण लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत चक्क पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचं 'रेट कार्ड' छापलं जाण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना ते नेमका किती खर्च करण्याचा विचार करत आहेत याचा अंदाज त्यांना यावा यासाठी थेट निमंत्रण पत्रिकेतच रेटकार्ड छापण्याचा निर्णय वर-वधूनं घेतला. यात दिल्या जाणाऱ्या आहेराच्या किमतीनुसारच पाहुण्यांच्या जेवणाची वर्गवारी करण्यात आली आहे.
भोजन समारंभाची माहिती देणाऱ्या रकान्यात चार विभाग करण्यात आले आहेत. यात लव्हिंग गिफ्ट, सिल्वर गिफ्ट, गोल्डन गिफ्ट आणि प्लॅटिनम गिफ्ट अशी नावं देण्यात आली आहेत. चारही विभागासाठी जेवणाची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या विभागात समावेश होणारं गिफ्ट किंवा आहेर आणला जाणार आहे याची माहिती लग्नाच्या एक दिवस अगोदर देण्याचीही सूचना पाहुण्यांना देण्यात आली आहे.
२५० डॉलरपर्यंत आहेर देणाऱ्या पाहुण्यांचा लव्हिंग विभागात समावेश करण्यात आला आहे. यात रोस्ट चिकन किंवा स्वार्डफिश मिळणार आहे. सिल्वर विभागात ५०० डॉलरपर्यंत आहेर देणाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर गोल्डन विभागासाठी १ हजार डॉलरपर्यंतचा आहेर आणि प्लॅटिनम विभागातील जेवण पाहुण्यांना हवं असेल तर २५०० डॉलरपर्यंतचं गिफ्ट किंवा आहेर द्यावा लागणार आहे.