कोरोना महामारीची दुसरी लाट लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. हॉस्पिटलमधील बेडची कमतरता, औषधांची कमतरता आणि ऑक्सीजनची कमतरता यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र, देशात अनेक लोक माणूसकीच्या नात्याने अनेकांना मदत करत आहेत. असेच एक कोरोना योद्धा आहेत मंजूर अहमद. ४८ वर्षी मंजूर अहमद काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील आहेत. त्यांना अस्थमा आहे आणि गेल्या ३ वर्षांपासून ते ऑक्सीजन सपोर्टवर आहेत. मात्र, अशा स्थितीतही ते एका छोट्या टेम्पोमध्ये गरजू कोविड रूग्णांपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवत आहेत. ते म्हणाले की, 'मला एका ऑक्सीजन सिलेंडरचं महत्व माहीत आहे आणि ते न मिळाल्यावर होणारा त्रासही मला माहीत आहे'.
DNA सोबत बोलताना मंजूर म्हणाले की, 'माणूसकीच्या नात्याने जर मी कुणापर्यंत ऑक्सीजन पोहोचवण्यात आणि कुणाचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरत असेल किंवा थोडा दिलासा देऊ शकत असेन, तर मला स्वत:ला चांगलं वाटेल. मी स्वत: दम्याचा रूग्ण आहे. आणि एका रूग्णासाठी ऑक्सीजनचं महत्व समजू शकतो. हेच छोटसं काम आहे जे मला लोकांसाठी करायचं आहे'. (हे पण वाचा : माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ)
मंजूर अहमद यांची हिंमत कौतुकास्पद आहे. कारण या स्थितीतही ते दुसऱ्यांसाठी आशेची किरण ठरत आहेत. ते केवळ लोकांच्या घरांपर्यंत केवळ ऑक्सीजन सिलेंडरच पोहोचवत नाही तर रिकामं सिलेंडर पुन्हा भरून देण्याची सुविधाही देतात. ते सांगता की, त्यांचाही एक परिवार आहे. त्यांचं पोट त्यांना भरायचं आहे. त्यामुळे ते इतक्या लवकर जीवनाकडून हार मानू शकत नाहीत.
ते सांगतात की, 'या महामारीमुळे मी घरात बसू शकत नाही. माझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी आहे. मला त्यांच्यासाठी पैसे कमवायचे आहेत. माझी औषधेही महागडी आहेत. त्यावर महिन्यातून ६ ते ७ हजार रूपये खर्च होतात. सोबतच घरातही वेगळा खर्च असतोच. त्यामुळे मला काम करायचं आहे. मला वाटतं लोकांनी आशा सोडू नये....त्यांनी हिंमत ठेवावी'.