जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी किंवा भावनिक होतो तेव्हा आपल्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात. रडणे हे कमजोर असल्याचे लक्षण आहे असे अनेकदा म्हटले जाते. पण विज्ञान काय सांगते हे तुम्हाला माहीत आहे का? विज्ञानानुसार रडणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे मानसिक स्टिग्मा म्हणजेच मनावरील जळमटं दूर होतात.
हे लक्षात घेऊनच स्पेनची राजधानी मॅड्रिडमध्ये एक अनोखी क्राइंग रूम (crying room) सुरू करण्यात आली आहे. तुम्ही घरात बेडरूम, लिव्हिंग रूम असल्याचं ऐकलं असेल पण तुम्ही कधी रडण्याची खोली (crying room) असल्याचं ऐकलं आहे का? होय, हे अगदी खरे आहे. स्पेनमध्ये लोक उघडपणे रडतात. ही अशी जागा आहे जिथे लोक मनमोकळेपणाने रडू शकतात. लोकांच्या मनातील सोशल स्टिग्मा दूर करणे हे या प्रकल्पाचे खरे उद्दिष्ट आहे. याद्वारे असे सांगितले जाते की रडणे हे दुर्बलतेचे लक्षण नाही किंवा मदत मागितल्यामुळे आपण कोणाच्या नजरेत खाली पडू असे मुळीच नाही.
नेमकी काय आणि कुठे आहे ही क्राइंग रूमही क्राइंग रूम स्पेन मधील सेंट्रल मॅड्रिड येथे आहे. तुम्ही या रूममध्ये गेल्यावर 'या' आणि 'रडा', 'मी खूप अस्वस्थ आहे' असे शब्द लिहिलेले दिसून येते जे की गुलाबी रंगात चमकत असते. हा या गोष्टीचा संकेत आहे की रडणे खूप सामान्य गोष्ट आहे आणि याद्वारे तुम्ही तुमचा तणाव कमी करू शकता. खोलीच्या दुसर्या बाजूला एक फोन आहे ज्यात याआधी त्या खोलीत आलेल्या लोकांचे नंबर लिहिलेले आहेत. या नंबरर्समध्ये अनेक मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा देखील समावेश आहे. कोणाला हवे असल्यास ते यापैकी कोणाशीही फोन करून बोलू शकतात आणि आपले अनुभव सांगू शकतात किंवा समोरच्या व्यक्तीचे अनुभव ऐकू शकतात. २०१९ मध्ये, स्पेनमध्ये ३,६७१ लोक आत्महत्येने मरण पावले, जे नैसर्गिक कारणांनंतर मृत्यूचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. सरकारी आकडेवारीनुसार, १० तरुणांपैकी एकाला मानसिक आरोग्याची समस्या आहे.
भारताची परिस्थीती काय आहे?मेंटल स्टिग्मा ही केवळ स्पेनमधील समस्या नाही तर संपूर्ण जग या समस्येशी झुंज देत आहे. भारतात दर २० पैकी एक व्यक्ती डिप्रेशनने ग्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात तणावग्रस्त लोकांची संख्या सर्वाधिक आहे. स्किझोफ्रेनिया, चिंता, तणाव या भारतातील प्रमुख मानसिक समस्या आहेत. ३८ दशलक्ष म्हणजेच मिलियन भारतीय लोक केवळ चिंतेने किंवा एग्जांयटीने ग्रासलेले आहेत.
मेंटल हेल्थवर चर्चा करणं का आहे जरूरी?कोविड-19 च्या काळात लोक मानसिक आरोग्याबद्दल अधिक मनमोकळेपणे बोलू लागले आहेत. तसे तर मानसिक आरोग्य ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी कोणताही ठराविक किंवा योग्य दिवस नसतो. म्हणूनच जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही त्याबद्दल ताबडतोब कोणाशीतरी बोलले पाहिजे. तसंच कोणी यातून जात असेल तर समोरची व्यक्ती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. बर्याच वेळा लोक मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यास घाबरतात आणि आतल्या आत कुंठत राहून अधिक आजारी पडू लागतात.
मनमोकळेपणाने रडण्याचे काय आहेत फायदे?मनमोकळेपणाने रडणे किंवा आपली समस्या कुणासमोर उघडपणे सांगणे यामुळे तुमचा ताण कमी होतो. तुम्हाला आतून फ्रेश वाटू लागते. मनमोकळेपणाने रडल्याने तुम्हाला भावनांवर नियंत्रण मिळवता येते. तुम्हाला इतरांकडून भावनिक आधारही मिळतो. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन रिलीज होतात. जे आपल्या तणावाची पातळी कमी करण्यास मदत करतात. ज्याप्रमाणे घामावाटे व लघवीवाटे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसंच, अश्रूंद्वारेही ही क्रिया घडते. अश्रूंमध्ये लाइसोजाइम नावाचं तत्व असतं. त्यामुळे बाहेरील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होत नाही. तसंच, डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. पण फक्त रडल्यामुळेच हे तत्त्व अश्रूंद्वारे डोळ्यातून बाहेर पडतात. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण औषधं व योग इत्यादींची मदत घेतात. पण खरं तर अशावेळी रडणं हा जास्त उत्तम उपाय मानला जातो. जवळच्या व्यक्तीला मिठी मारून रडल्यानं मन हलकं होतं. त्यामुळं जीवनाचा खरा आनंद घेता येतो.
रडण्यातील फरक समजून घ्याताण-तणावामुळं रडू कोसळणं व डोळ्यांना होत असलेल्या त्रासामुळं डोळ्यातून पाणी येणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जेव्हा आपण रडतो तेव्हा शरीरातून एन्ड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक आणि ल्युसिन नावाचे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात. पण नुसतंच डोळ्यातून पाणी बाहेर पडल्यानं मात्र तसं होत नाही. तसंच अश्रू डोळ्यातील मेमब्रेनला सुकू देत नाहीत. मेमब्रेन सुकल्यानं दृष्टीत फरक पडतो. त्यामुळं माणसाला कमी दिसू लागते. मेमब्रेन योग्य असेल तर बऱ्याच काळापर्यंत दृष्टी शाबुत राहते.
रडल्यामुळे ताणतणाव दूर होतोच शिवाय मूडही चांगला राहतो. अनेकजण आलेला राग आणि ताण लपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु पुढं जाऊन या सगळ्याचं भयंकर त्रासात रूपांतर होते. ताणतणावापासून मुक्त व्हायचं असेल आणि रडू येत असेल तर मनमोकळेपणानं रडायला हवं. रडल्यामुळे आपला स्वाभिमान दुखावला जाईल, असं काहींना वाटतं. विशेषत: पुरुषांना तसं वाटतं. खरं तर पुरुषांनाही अनेकदा रडावंसं वाटतं पण ते रडत नाहीत. एकदा मनमोकळेपणाने रडलो की मूड चांगला व रिफ्रेश होतो, मन हलकं झालंय असं वाटतं हे संशोधनातून सिद्ध झालंय.