Cute Charge in Air Ticket : नुकतेच इंडिगो फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने त्याचे एअर तिकीट सोशल मीडियावर शेअर केले. त्याच्या तिकिटात सर्व शुल्कांसोबतच एक 'क्यूट' शुल्काचाही ( Cute Charge ) समावेश असल्याचे दिसून आले. आता या क्यूट चार्जवरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काही लोक या चार्जचा अर्थ सांगत आहेत, तर काही जण त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एअर तिकीट ( Air Ticket ) शंतनू नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केले आहे. त्यांच्या तिकिटात क्यूट चार्जच्या नावावर १०० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले आहे. शंतनू यांनी लिहिले आहे की - मला माहित आहे की मी वयानुसार जास्त गोंडस ( cute ) आहे, परंतु इंडिगो माझ्याकडून यासाठी पैसे घेईल असे कधीच वाटले नव्हते.
शंतनू यांनी हे ट्वीट केल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. आणखी एका ट्विटर युजरने लिहिले की मीदेखील हे ट्विट केले होते, तेव्हा ते व्हायरल का झाले नाही? तर दुसऱ्या एका युजरने सीट फी दाखवून तिकीट शेअर केले. एका यूजरने तर मजेशीरपणे लिहिले की, जे गोंडस नाहीत त्यांच्यासाठी हे शुल्क म्हणजे एक प्रकारचे शोषणच म्हणावे लागेल. या ट्वीटरवरून बरेच तर्कवितर्क लढवण्यात आले. अखेर विमान कंपनीनेच याबद्दलचे स्पष्टीकरण दिले.
'इंडिगो'ने स्वत:च Cute Charge काय आहे ते सांगितले-
इंटरनेटवर लोक Cute Charge बद्दल खूप गोंधळलेले होते. शेवटी, इंडिगोने स्वतः स्पष्ट केले की क्यूट चार्ज नक्की काय आहे आणि तो का आकारला जातो. IndiGo नुसार – CUTE म्हणजे Common User Terminal Equipment. हे शुल्क सामान्य वापरकर्ता टर्मिनल उपकरणांसाठी आकारले जाते. यामध्ये मेटल डिटेक्शन मशीन, एस्केलेटर आणि इतर उपकरणांचा समावेश आहे. हे शुल्क प्रत्येक विमानतळावर नव्हे तर काही निवडक विमानतळांवर लागू आहे.