आपला देश अशा अभ्यारण्यांनी समृद्ध आहेत जिथे वृक्षसंपदा आणि वन्यप्राणीजीवन बहरत आहे. या अभयारण्यांमुळे पृथ्वीवरील निर्सगसंपन्नतेचं खऱ्या अर्थाने रक्षण होतंय. या वनसंपदेत अनेक प्राण्यांच्या प्रजाती आढळून येतात. काही अभयारण्ये त्यातील दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजातीमुळेही प्रसिद्ध आहेत. सध्या दार्जिलिंगस्थीत पद्मजा नायडू हिमालयन जूलॉजिकल पार्क (Darjeeling Zoo) इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलंय. या पार्कमधल्या दोन छोट्याश्या जीवांचा व्हिडिओ नेटीझन्सकडून व्हायरल केला जातोय. या व्हिडिओत दोन असे जीव आहेत जे त्यांच्या क्युटनेसमुळे सर्वांच्या आवडीचा विषय ठरत आहेत...
दार्जिलिंगमधील तपसेडाराच्या ब्रीडींग सेंटरमध्ये लाल पांडाच्या (Red Panda)दोन पिल्लांचा जन्म झाला आहे. त्यांचा जन्मल्यानंतरचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. यात नुकतेच जन्मलेले दोन रेड पांडा एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. या नवजात लाल पांडाच्या आईचे नाव शोभा व वडिलांचे नाव नोएल आहे. या रेड पांडांच्या जन्मामुळे या पार्कमध्ये पांडांची संख्या आता २५ झाली आहे. या पार्कचे संचालक धर्मदेव राय यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत दोन्ही नवजात पांडा सुखरुप आणि स्वस्थ असल्याचे सांगितले.
या दोन रेड पांडांचा व्हिडिओ सोशल मिडियावर काही क्षणांतच व्हायरल झाला. लोक हा व्हिडिओ बघुन खुप खुश झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ७ हजारपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. ते या व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. अनेकांनी या पिल्लांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.दार्जिलिंगमध्ये पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क ७ हजार फूट (२,१३४ मीटर) इतक्या उंचावर आहे. हे देशातील सर्वात उंच प्राणीसंग्रहालय आहे. इथे लाल पांडा (Red Panda), हिम बिबट्या (Snow Leopard), तिबेटियन लांडगा आणि अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती आहेत.