सामान्यपणे घरांमध्ये जेव्हा मुलं बऱ्यापैकी मोठी होतात, तेव्हा त्यांना पॉकेट मनी दिली जाते. पॉकेट मनीच्या माध्यमातून ते आपल्या गरजा पूर्ण करतात. यातून ते काही आवश्यक वस्तू खरेदी करतात किंवा खाण्या-पिण्याच्या गोष्टी घेतात. अनेकदा घरातून मुलांना पैसे मिळाले नाही तर मुलं घरात पैशांची चोरीही करतात. मात्र, पैशांसाठी एका मुलीनं असं काही केलं की, वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
चीनच्या एका शाळेत शिकणाऱ्या मुलीला स्वत:साठी काही ट्रेण्डी ज्वेलरी हवी होती. यासाठी तिनं तिच्या आईचे महागडे दागिने घरातून घेतले आणि बाजारात जाऊन ७०० रूपयांना विकले. आईला जेव्हा हा समजलं तेव्हा तिला धक्का बसला. कारण १ मिलियन युआनचे दागिने केवळ ६० युआनमध्ये विकले. सुदैवानं पोलिसांनी यात लगेच मदत केली.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे शाळेत शिकणारी एक मुलगी तिच्या आईचे कोट्यावधी रूपयांचे दागिने घेऊन एका छोट्या स्टॉलवर गेली होती. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, या दागिन्यांची एकूण किंमत १ कोटी २२ लाख रूपयांपेक्षा जास्त होती. मुलीला याबाबत जराही अंदाज नव्हता. तिला तिच्यासाठी एक लिप स्टड आणि ईअररिंग्स हवे होते. या दोन्ही वस्तू ६० युआन म्हणजे ७०० रूपयांना मिळतात. अशात मुलीनं आईचे दागिने दुकानदाराला दिले आणि त्या बदल्यात आपल्या आवडीच्या वस्तू घेतल्या.
मुलीच्या आईला जेव्हा हे समजलं, तेव्हा तिने लगेच पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व्हिलांस फुटेजच्या माध्यमातून दुकानदाराला ओळखलं आणि त्याला फोन केला. तो कसातरी दागिने घेऊन परत आला आणि महिलेला दागिने परत दिले. दागिन्यांमध्ये ब्रेसलेट्स, नेटलेसेज आणि अनेक गोष्टी होत्या. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.