सतीश डोंगरे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - दरवर्षी भारतीय वकिलातीच्या भिंतीआड होणारा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यावर्षी लंडनमध्येदेखील उत्साहात साजरा करण्यात आला. लंडनस्थित शेकडो भारतीय नागरिकांनी बार्किंग टाऊन हॉल येथे एकत्र येऊन डौलाने तिरंगा फडकाविला. यावेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याचा आनंद आणखीच द्विगुणित केला. लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपला राष्ट्रीय उत्सव साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर महापुरुषांना अभिवादन करता यावे या हेतूने भारतीय नागरिकांनी हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार बार्किंग टाऊन हॉल येथे सकाळी सात वाजताच शेकडोच्या संख्येने लहान-मोठ्यांसह नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले होते. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर खास भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. रंगीबेरंगी कपडे परिधान करून आलेल्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारी नृत्येही सादर करण्यात आली. चिमुकल्यांचा उत्साह बघून काही ब्रिटन नागरिकही या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनीदेखील तिरंग्याला मानवंदना देऊन भारतीय नागरिकांसोबत या उत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला. बार्किंग टाऊन हॉल येथे स्वातंत्र दिन साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष असून, ही परंपरा भविष्यात कायम ठेवण्याचे मत यावेळी आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आल्याची माहिती नाशिकमधून लंडनमध्ये स्थित झालेल्या अपर्णा महाले यांनी दिली.