ऑनलाइन लोकमत
हुबळी, दि. 20 - धारवाड येथे अंत्यसंस्कारासाठी जमलेले लोक, नातेवाईक आणि ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा मृतदेह आपल्या जाग्यावर उठून बसला. 17 वर्षीय तरुणाला अंत्यसंस्कारासाठी नेलं जात असतानाच तो तिरडीवर उठून बसला आणि लोकांची धावपळ सुरु झाली. उपस्थितांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
एक महिन्यापूर्वी 17 वर्षीय कुमार मारेवाड याचा भटक्या कुत्राने चावा घेतला होता. गेल्याच आठवड्यात त्याची तब्बेत खराब झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. तब्बेत बिघडत चालली असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
डॉक्टरांनी नातेवाईकांना तब्बेत नाजूक असून लाईफ सपोर्ट सिस्टम हटवल्यास जगण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं होतं. संपुर्ण शरिरात संक्रमणाचा फैलाव झाला असून पुढील उपचार सुरु ठेवायचे की नाही हे कुटुंबाला ठरवायचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर कुमारला घरी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
घरी गेल्यावर कुमारच्या शरिराची काहीच हालचाल न झाल्याने कुटुंबाला मृत्यू झाल्याचं वाटलं आणि त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. पण अंत्यसंस्कार होण्याआधीच कुमार ताडकन उठून बसला. गावापासून दोन किमी अंतरावर अंत्यसंस्कार होणार होते, मात्र तोपर्यंत कुमारने हालचार करत जोरात श्वास घेण्यास सुरुवात केली. त्याला गोकुळ रोडवरील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुमारला व्हेंटिलेटरवर ठेवलं असून, कुत्र्याने चावा घेतला असल्याने त्याला इन्फेक्शन झालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.