ज्याला मृत समजलं तो रस्त्यावर फिरताना दिसला, कोरोना काळात झाली १६ वर्षाआधी बेपत्ता झालेल्या भावाची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 11:16 AM2021-05-14T11:16:54+5:302021-05-14T11:19:49+5:30
पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.
कोरोना काळात बहुतेक परिवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मात्र, या काळातही एका परिवाराच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. कारण १६ वर्षापूर्वी हरवलेला घरातील सदस्या अचानक सापडला. ही घटना मध्य प्रदेशच्या बैतूलमधील आहे. येथील एक व्यक्ती मानसिक आजारी आहे आणि तो कुठेही फिरत होता. पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली तर समजलं की, तो कटनी जिल्ह्यातील राहणाारा आहे आणि १६ वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.
घरातील लोक इतकी वर्ष त्याला मृत समजत होते. त्या व्यक्तीची बुधवारी बैतूल पोलिसांनी परिवारासोबत भेट घडवून आणली. ही व्यक्ती बेवारसपणे कुठेही रस्त्यांवर फिरत राहत होती. बैतूलच्या चक्कर रोडवर जेव्हा ४५ वर्षीय व्यक्तीसोबत पोलीस बोलले तर तो कटनी जिल्ह्यातील राहणारा असल्याचं समजलं. त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मात्र, त्याला घराचा पत्ता लक्षात होता. जेव्हा त्याच्या गावात संपर्क केला गेला तर समजलं की, तो १६ वर्षांपासून गायब आहे. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर तो परिवाराला पुन्हा भेटू शकला.
सुरेश पटेल असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा फोटो जेव्हा परिवाराला दाखवण्यात आला तेव्हा एका क्षणात त्याला ओळखलं गेलं. त्याची बहीण अंजू त्याला घेण्यासाठी बैतूला पोहोचली तर तिच्यावर भाऊ पुन्हा भेटल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.
असे सांगितले जात आहे की, सुरेशचं पत्नी आणि सासरच्या लोकांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भांडण झालं होतं. तेव्हा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यानंतर तो घर सोडून गेला. खूपदा शोध घेऊनही तो कुणाला सापडला नाही. दोन मुलांचा वडील सुरेश १६ वर्षांपासून इकडे-तिकडे भटकत होता. मानसिक स्थिती ठीक नसल्याने घरीही पोहोचू शकत नव्हता. काही महिन्यांनी घरातील लोकांनी त्याला मृत समजलं आणि त्याचा शोध थांबवला.
पोलिसांच्या मदतीने त्याची बहीण अंजू पटेल त्याला घ्यायला आली तर ती भावाला बघून भावूक झाली. महिला आपल्या भावाला घेऊन गावी गेली. अंजू पटेल म्हणाली की, हा आमचा मोठा भाऊ आहे. १६ वर्षांपासून बेपत्ता होता. सासरी पैशांवरून वाद झाला होता. त्याला मारहाण केली होती. त्यात त्याची मानसिक स्थिती बिघडली. आम्ही त्यांचा खूप शोध घेतला. पण सापडला नाही. आज बैतूल पोलिसांमुळे भाऊ भेटला.