सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी फार प्रगती केली आहे. परंतु, काही प्रकरणं अशी असतात, जिथे आधुनिक उपचारांचाही काही फायदा होत नाही. अशावेळी अनेकदा डॉक्टर जुन्या पद्धतींचा आणि तंत्राचा पुन्हा वापर करतात. असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. भारतीय डॉक्टरांनी 3000 वर्षांपूर्वीची पद्धत वापरून अफगाणिस्तानमधील एका महिलेचं नाक पुन्हा बनवून दिलं आहे. ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल ना? नाक बनवून दिलं म्हणजे नक्की काय केलं? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. गोंधळून जाऊ नका, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
गोळीबारामध्ये जखमी झाली होती महिला
अफगाणिस्तानमध्ये राहणारी महिला शम्सा एका गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारामध्ये तिच्या नाकाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला नाकाने गंध घेणं किंवा व्यवस्थित श्वास घेणंही अशक्य झालं होतं. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी जे तंत्र वापरून शम्साचं नाक ठिक केलं आहे, ते 3000 वर्षांपूर्वी वापरलं जाणारं तंत्र आहे.
एखाद्या पक्षाप्रमाणे दिसत असे नाक
शम्साला लागलेली गोळी ही नाकाच्या आतपर्यंत गेली होती. त्यामुळे नाकाच्या आतपर्यंतच्या भागाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या सर्व कारणांमुळे नाक पूर्णपणे नाहीसं झालं असून ते दिसण्यास एखाद्या पक्षाच्या नाकाप्रमाणे दिसत होतं. शम्साने अनेक डॉक्टरांशी बोलून प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी ती दिल्लीला आली.
ही पद्धत वापरून करण्यात आले उपचार
ऑपरेशन मेडस्पारचे प्लॉस्टिक सर्जन अजय कश्यप यांनी सांगितल्यानुसार, 'आमच्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की, वैद्यकिय क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक पद्धती या प्राचीन पद्धतींवर आधारीत आहेत. आजही प्राचीन पद्धतींच्या तंत्राच्या मदतीने आम्ही नाक आणि कान व्यवस्थित तयार करू शकतो. हेच तंत्र वापरून आम्ही गालाच्या स्किनचा वापर करून नाक तयार केलं आहे.'
आता नाकाने गंध घेणं सहज शक्य
ऑपरेशन नंतर शम्साने सांगितलं की, ती फार खुश आहे की, तिला पुन्हा गोष्टींचा गंध घेणं शक्य होणार आहे. या सर्जरीमुळे माझं जीवन बदलून गेलं आहे. तिनं सांगितलं की, मी ज्या देशामध्ये राहते तिथे गोळीबार होणं ही एक साधारण बाब आहे. पण या गोळीबारामधून वाचलेल्या व्यक्तिंना मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावं लागतं.