ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 3 - हुंडा, वैचारिक मतभेद अशा गोष्टींमुळे लग्न मोडल्याच्या घटना तशाच नेहमीच पाहायला मिळतात. मात्र मैनपूरी येथे फक्त आणि फक्त मुलाला हिंदीमधील काही शब्द व्यवस्थित लिहिता आले नाहीत म्हणून लग्न होता होता राहिलं. मिळालेल्या माहितीनुसार मुलीने मुलाला ‘सांप्रदायिक’ आणि ‘दृष्टिकोण’ शब्द लिहिण्यास सांगितलं होतं. मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर दोन्ही कुटुबांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही.
मैनपुरी जिल्ह्यातील कुरावली येथे राहणा-या मुलीचं लग्न फरुखाबाद येथे राहणा-या मुलाशी ठरलं होतं. मुलाचं शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं, तर मुलगी फक्त पाचवीपर्यंतच शिकली होती. सोमवारी मुलगा आणि मुलीची भेट घडवून आणण्याचं ठरलं. मंगळवारी दोघेही आपापल्या कुटुंबासोबत ठरलेल्या ठिकाणी पोहोचले.
एकांत मिळावा यासाठी दोघांनाही एकटं सोडून दिलं. यानंतर बोलता बोलता मुलीने डायरी काढून मुलाच्या हाती दिली आणि काही हिंदी शब्द लिहिण्यास सांगितलं. मुलाने सर्व शब्द एकदम बरोबर लिहिले होते. मुलाने आपल्याला मुलगी पसंत असून सर्व काही फायनल झाल्याचं सांगितलं. त्याचवेळी मुलीला काय सुचलं काय माहित आणि तिने पुन्हा एकदा डायरी आणि पेन त्याच्या हाती सोपवलं. यावेळी तिने सांप्रदायिक’, ‘दृष्टिकोण’, ‘परिश्रम’ सारखे हिंदी शब्द लिहिण्यास सांगितलं. इतकंच नाही तर मुलाला त्याच्या घरचा पत्ताही लिहिण्यास सांगितला.
डायरी चेक केली तर पत्त्यासोबत सगळे शब्द चुकलेले होते. यावरुन मुलीचा पारा चढला आणि तिने लग्नास नकार दिला. उपस्थित नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण मुलगी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी दोन्ही कुटुंब मोकळ्या हाती परतली.