तुम्ही बाईक आणि कारमध्ये विविध प्रकारचे मॉडिफीकेशन केलेले अनेकदा पाहिले असेल. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधून मॉडिफिकेशनची अनोखी घटना समोर आली आहे. दोन भावांनी त्यांच्या जुन्या कारला मॉडिफीकेशन करुन 'हेलिकॉप्टर' बनवले. ही अनोखी कार लग्नात वधू-वराच्या एन्ट्रीसाठी किरायाने देऊन पैसे कमावण्याची त्यांची योजना होती. पण, त्यांच्या या योजनेवर पोलिसांची नजर पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरदीन आणि परमेश्वरदीन, हे दोन भाऊ भिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खजुरी बाजार येथील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांच्या जुन्या कारमध्ये बदल करुन 'हेलिकॉप्टर'चे स्वरूप दिले. ही कार लग्नात वधु-वराच्या एन्ट्रीसाठी वापरुन पैसे कमावण्याची त्यांची योजना होती. कार पूर्ण मॉडिफाय झाल्यानंतर पेटिंगसाठी घेऊन जात असताना वाहतूक पोलिसांनी दोघांना अडवले. चौकशी केल्यानंतर एमव्ही कायद्यान्वये ही मॉडिफाईड कार जप्त करण्यात आली.
याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल पांडे म्हणाले की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दक्षता वाढवली आहे. याअंतर्गत रविवारी अकबरपूर कोतवाली परिसरात ही अनोखी कार दिसून आली. पोलिसांनी एमव्ही कायद्यान्वये कार जप्त केली. या फेरबदलासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. अखेर पोलिसांनी दंड घेऊन ही कार सोडली. मात्र त्याचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या.