सिरिसिल्ला:देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या पूरसदृश परिस्थिती आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना त्यांच्या दैनंदिन कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक भागात पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की घराबाहेर उभ्या असलेली वाहनेही पुराच्या पाण्याने वाहून जात आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तेलंगणाच्या राजन्ना सिरिसिल्ला जिल्ह्यातील शांतीनगर परिसरातील रस्ते पुराच्या पाण्यात बुडल्याचे दिसत आहे. या पाण्याचा प्रवाह वेगावान दिसत आहे. अशा परिस्थितीत, एका व्यक्तीने आपली कार वाहून जाण्यापासून वाचवण्यासाठी एक आगळावेगळा जुगाड केला आहे. त्याने आपली कार चक्क दोरीच्या साहाय्याने बांधली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर पाणी भरले आहे आणि पाण्याचा प्रवाहदेखील खूप वेगाने आहे. यात एक कार अर्धी बुडलेली दिसतीये. त्याच वेळी, एक माणूस त्याच्या छतावर उभा आहे आणि कारचा पुढचा आणि मागचा भाग दोरीने घट्ट बांधल्यानंतर तो दोर छताच्या खांबाला बांधत आहे. या जुगाडचा संपूर्ण व्हिडीओ कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.