वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपण पाहतो की, वेगवेगळे पदार्थ आणि वेगवेगळी फुलं देवाला वाहिली जातात. पण केरळच्या कोल्लममधील दुर्योधन मंदिरातील एक आश्चर्य समोर आलं आहे. येथील दुर्योधन मंदिरात भक्त देवाला दारूच्या बाटल्या प्रसाद म्हणून चढवतात. हे ऐकायला जरा विचित्र असलं तरी खरं आहे.
कोल्लमच्या एडक्कड परिसरात हे मंदिर असून या मंदिराचं पूर्ण नाव पोरूवझी पेरूवथी मलनाड दुर्योधन मंदिर असं आहे. सध्या इथे वार्षिक उत्सव सुरू होता. इथे एका भक्ताने भेट म्हणून १०१ ओल्ड मॉन्क दारूच्या बाटल्या चढवल्या.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, असे मानले जाते की, जेव्हा दुर्योधन या गावात आले होते तेव्हा त्यांना तहान लागल्यावर त्यांनी स्थानिक मद्य सेवन केलं होतं. हे मद्य सेवन करून त्यांची तहान भागली आणि ते आनंदी सुद्धा झाले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात दुर्योधनाला दारूच्या बाटल्या चढवल्या जातात. दक्षिण भारतातील हे दुर्योधनाचं एकुलतं एक मंदिर आहे.
या मंदिराबाबत मंदिराचे सचिन एसबी जगदीश यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, 'आधी या मंदिराला देवाला अर्क प्रसाद म्हणून चढवली जात होती. पण यावर सरकारने बंदी घातली. त्यामुळे आता लोक विदेशी दारू इथे प्रसाद म्हणून चढवतात. तसेच स्थानिक मद्य तोड्डीही चढवली जाते. इतकेच नाही तर इथे भक्त पान, चिकन, बकरी आणि सिल्कचे कपडेही भक्त चढवतात. यावेळी तर एका एनआरआयने ओल्ड मॉन्कच्या १०१ बॉटल्स चढवल्या'.