दिवाळी म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ते सणाची शोभा वाढवणारे दिवे. दिवाळीचा सण अवघ्या तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपलाय. बाजारात रंगेबीरंगी दिवे दिसायला सुरूवात झाली आहे. मातीचे, पीओपी मटेरिअलचे, मेणाचे दिवे तुम्हाला माहीतच असतील. आज आम्ही तुम्हाला एका खास प्रकारच्या दिव्यांबद्दल सांगणार आहोत.
अलिगढमधील एका गौशाळेत गाईच्या शेणापासून दिवे आणि देवतांच्या मुर्ती तयार केल्या जातात. पूर्वी दिवाळी किंवा कोणताही सण असल्यास चीनमध्ये तयार करण्यात आलेले साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री केले जात होते. कोरोनाची माहामारी लक्षात घेता सध्या भारतात तयार होत असलेल्या वस्तूंना मागणी वाढत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अलिगढच्या श्रीगुरू गौशाळेत हे काम केलं जात आहे.
या ठिकाणी गाईच्या शेणाचा वापर करून देवाच्या मुर्ती आणि दिवे बनवले जात आहेत. यामुळे स्थानिक प्रवासी मजूरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होत आहे. या मुर्ती खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत. या माध्यमातून नैसर्गिक संसाधनांचा वापर करत नवनवीन वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. या मुर्तींमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही.
याशिवाय छत्तीसगडमधील कोंडागाव येथिल रहिवासी असलेले अशोक चक्रधारी यांनी २४ ते ४० तासांपर्यंत जळणारा मातीचा दिवा तयार केला आहे. शिल्पकार अशोक चक्रधारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षांपूर्वी त्यांनी असा दिवा पाहिला होता. आपणही असा दिवा बनवावा असं नेहमी त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी हा दिवा तयार केला आहे.
वृत्तसंस्था एएनआयने अशोक चक्रधारी यांच्या या कामगिरीबद्दल माहिती देत अशोक यांनी तयार केलेल्या दिव्याचे फोटोज पोस्ट केले होते. अशोक चक्रधारी यांनी सांगितले की, या वर्षी नवरात्रीत त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं की, तुम्ही जसा दिवा तयार केला आहे. तसाच दिवा आम्हाला बनवून हवा आहे. अशोक यांना नंतर कळून आलं की, त्यांनी तयार केलेला दिवा तुफान व्हायरल झाला आहे. तेव्हापासून अशोक यांनी रोज ५० ते ६० विशेष दिवे तयार करायला सुरूवात केली. या दिव्यांची किंमत २०० ते २५० रुपये इतकी ठेवली आहे.