जगभरात वेगवेगळ्या प्रजातींचे साप आढळतात. लहान, मोठे काही विषारी तर काही बिन विषारी असतात. सापांना जास्तीत जास्त लोक घाबरतात. सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांची झोप उडते. त्यामुळे लोक सापांपासून दूरच राहतात. सोशल मीडियावर सापांपासून वाचण्याचे अनेक उपाय सांगितले जातात. ज्यात दावा केला जातो की, साप जर मागे लागला तर सरळ कधी धावू नये. उलट S पॅटर्नमध्ये धावावं. मुळात यात किती तथ्य आहे हे अनेकांना माहीत नसतं. मुळात आधी हा प्रश्न येतो की, साप तुमचा पाठलाग करतात का? याबाबतचा खुलासा एका स्नेक एक्सपर्टने केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सापांवर रिसर्च करणारे कीथ टेलर यांनी सांगितलं की, जोपर्यंत तुम्ही सापाला त्रास देत नाही तोपर्यंत साप तुम्हाला दंश मारायला येत नाही. सापाला त्रास दिला तरच तो तुमच्या हल्ला करतो. साप नेहमीच पळून जाण्याच्या भूमिकेत असतात. जर एखाद्या मनुष्याचा सामना झाला तेव्हा देखील साप पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात.
साप पाठलाग करतात का?
एक्सपर्ट सांगतात की, जर साप नेहमी बचावाच्या आणि पळून जाण्याच्या भूमिकेत असतात तर ते तुमचा पाठलाग कसा करतील? त्यामुळे सापांपासून बचाव करण्यासाठी S पॅटर्नमध्ये धावण्याचा दावा एक गैरसमज आहे. साप वेगाने दिशा बदलू शकतात आणि सहजपणे S पॅटर्न असलेल्या रस्त्यावर सरपटू शकतात. तुम्हाला जर सापापासून वाचायचं असेल तर सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे सापांपासून दूर रहा. त्याला डिवचण्याचे कोणतेही प्रयत्न करू नका. तुम्ही पळाले तर सापही तुमच्यावर हल्ला करू शकतो.
सापांना कमी दिसतं
कीथ यांच्यानुसार, कोब्रासहीत काही सापांना स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांच्याजवळ येते तेव्हा ते मागे सरकतात किंवा खाली झुकतात. त्यांना मागे सरकताना पाहून अनेकांना वाटतं की, साप आता हल्ला करणार. पण असं नाहीये. तुम्ही जर स्थिर राहिले तर साप तुम्हाला बघणारही नाही आणि गपचूप निघून जातील. पण जर काही हालचाल केली तर त्यांना धोका जाणवेल आणि ते हल्ला करू शकतात. त्यामुळे नेहमी सापांपासून दूर रहा.