रंगा आणि बिल्ला ही नावं कितीतरी सिनेमांमध्ये तुम्ही ऐकली असतील. साधारण ७०-८० च्या दशकातील बहुतेक व्हिलन किंवा साइड व्हिलनची नावं हीच राहत होती. पण ही नावं इतकी का वापरली जायची? तुम्हीही अनेकदा ही नावं ऐकली असतील. मुळात ही काही काल्पनिक नावं नाहीत. तर ७० च्या दशकातील हे दोघे भारतातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक होते. अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण...
६० च्या दशकात छोट्या-मोठ्या चोरी करून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारे रंगा(कुलजीत सिंह आणि बिल्ला(जसबीर सिंह) ७० च्या काळापर्यंत कुख्यात गुन्हेगार झाले होते. १९७८ मध्ये या दोघांनी अपहरण आणि हत्येचा एक असा गुन्हा केला होता की, त्यावेळी देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई सुद्धा टेंशनमध्ये आले होते. हा गुन्हा इतका मोठा होता की, देशभरात एकच चर्चा रंगली होती. देशच नाही तर परदेशातही यांची चर्चा होत होती.
२६ ऑगस्ट १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाने भारतीय नौसेनेचे अधिकारी मदन मोहन चोपडा यांची मुले गीता(१६) आणि संजय(१४) यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. अपहरणाच्या २ दिवसांनंतर २८ ऑगस्टला दोन्ही मुलांचे मृतहेद आढळून आले होते.
पैशांसाठी केलं होतं अपहरण
रंगा आणि बिल्लाने नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या एका मुलीचं आणि एका मुलीचं अपहरण खंडणीसाठी केलं होतं. पण जेव्हा रंगा आणि बिल्ला यांना कळाले की, या मुलांचे वडील नेव्हीमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी दोघांची हत्या केली.
दिल्लीसहीत देश हादरला होता
नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या मुलांच्या हत्याकांडामुळे दिल्लीसहीत देशाला धक्का बसला होता. त्यावेळी या घटनेची चर्चा परदेशातही पोहोचली होती. त्यानंतर लोकांमध्ये रंगा आणि बिल्लाची दहशत निर्माण झाली होती.
पंतप्रधानांनी दिले होते चौकशीचे आदेश
तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना जेव्हा या घटनेबाबत माहीत मिळाली तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता. कारण देशातील एका मोठ्या सैन्य अधिकाऱ्याही ती मुलं होती. त्यावेळी देशात लोकांमध्ये संताप बघायला मिळाला होता. रस्त्यांवर आणि संसदेत मोरारजी देसाई सरकारवर टिका झाली होती. तेव्हा मोरारजी देसाई यांनीच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.
नंतर पोलिसांनी मोठ्या मेहनतीनंतर ८ सप्टेंबर १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाला आग्र्याहून अटक केली. दोघेही आग्र्यात कालका मेलच्या त्या डब्यात चढले होते. हा डबा सैनिकांसाठी आरक्षित होता. यातीलच एका सैनिकाने पेपरमधील फोटोवरून दोघांना ओळखलं होतं. नंतर चार वर्ष दोघांची कोर्टात सुनावणी सुरू होती. अखेर १९८२ मध्ये रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली.