बंदुकीतून झाडल्या जाणाऱ्या बहुतेक गोळ्या लोकांना मारतात. अनेकदा आपण गुन्ह्याशी संबंधित बातम्यांमध्ये वाचतो की एखाद्या व्यक्तीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. पण, गोळी लागल्यानंतरही एखाद्याला गोळी अंगात घुसल्याचे समजलेच नाही तर? तुम्हाला नवल वाटेल पण, एका महिलेसोबत अशाच प्रकारची घटना घडली आहे. महिलेच्या शरीरात तीन महिने एक गोळी अडकली होती, पण तिला याची थोडीही माहिती नव्हती. तीन महिन्यानंतर तिला हे समजल्यावर धक्का बसला.
एका रिपोर्टनुसार, आदि ब्लॉय असे या महिलेचे नाव आहे. तिच्या शरीरात तीन महिन्यांपासून एका बंदुकीची गोळी होती, पण तिला हे स्नायूंचे दुखणे वाटले. त्या महिलेला मणक्यातही वेदना होत होत्या. वाढत्या वेदनांमुळे तिने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली आणि सीटी स्कॅन केले तेव्हा दृष्य पाहून डॉक्टरही अवाक् झाले. सीटी स्कॅनमध्ये त्या महिलेच्या शरीरात कुटलातरी धातू असल्याचे दिसले. तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या शरीरातून एक गोळी काढण्यात आली.
महिलेसोबत नेमकं काय घडलं ?महिलेने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी एका लग्नात तिला ही गोळी लागली होती. लग्नादरम्यान अचानक तिच्या पाठीत वेदना सुरू झाल्या, तिच्या खांद्यापासून पायापर्यंत दुखत होते. सुरुवातीला तिला वाटले की हा स्नायूंमध्ये ताण आलेला असावा. तिला पाटीवर एक छोटीशी जखमही दिसली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण वेदना वाढल्यावर ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा सत्य समोर आले.